इरफान खानचा शेवटचा सिनेमा जानेवारीत प्रदर्शित होणार

Irrfan khan

दिवंगत कलाकारांचे शेवटचे सिनेमे (Last Movie) प्रदर्शित करून त्यांच्या नावावर सिनेमा खपवण्याचा प्रकार बॉलिवुडसाठी नवीन नाही. याबाबतचा एक विस्तृत लेख आम्ही आमच्या वाचकांसाठी सादर केलेला होताच. अनेक कलाकारांचे शेवटचे सिनेमे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी प्रदर्शित झालेले आहेत. मागील आठवड्यातच आम्ही तुम्हाला ओम पुरी यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची माहितीही दिली होती. आता एक निर्माता इरफान खानचा (Irrfan Khan) डब्यात पडलेला सिनेमा प्रदर्शित करून इरफानच्या नावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

कोरोनामुळे सिनेसृष्टी सात-आठ महिने बंद होती. अनेक सिनेमे कोरोनामुळे पूर्ण होऊ न शकल्याने प्रदर्शित होऊ शकले नाहीत. तर तयार झालेले काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. मात्र काही छोट्या सिनेमांना ओटीटीवर जास्त किंमत मिळत नाही. आता पुन्हा थिएटर सुरु झाले असले तरी प्रेक्षक येत नसल्याने मोठे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. थिएटर मिळत असल्याने अशाच डब्यातील काही सिनेमांना चांगले दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत. इरफान खानचा तीन वर्षांपूर्वी तयार झालेला आणि लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झालेला ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस’ सिनेमा जानेवारीत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाणार आहे.

या सिनेमाची कथा एका आदिवासी महिलेची नूरनची आहे जी विंचवाचे विष उतरवण्यात वाकबगार असते. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये असे म्हटले जाते की, एखाद्याला विंचू चावला की ती व्यक्ती 24 तासातच मरण पावते. यावर एकमेव उपाय म्हणजे कोणीतरी येऊन त्याला विंचवाचे विष उतरवण्याचे गाणे ऐकवले तर तो वाचतो. नूरनने ही कला तिच्या आजीकडून झुबैदाकडून शिकलेली असते. इरफान खान नूरनचा आवाज ऐकून तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. यानंतर कथेत अनेक घडामोडी घडतात. या सिनेमात गोलशिफतेह फराहनी, वहिदा रहमान, शशांक अरोरा, तिलोत्तमा शोम यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन टांझानियात राहाणाऱ्या अनूप सिंहने केले आहे. पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमधून सिनेमाचे धडे घेतलेला अनूप भारतीय कथांवर सिनेमे तयार करतो. इरफान खान जीवंत असताना या सिनेमाला वितरक मिळाला नव्हता. पण आता वितरक मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या सिनेमाच्या निर्मितीत अभिषेक पाठकनेही मदत केलेली आहे. अभिषेकने सांगितले, इरफान खान यांनी या सिनेमात जबरदस्त काम केलेले आहे आणि ते मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर आणणे ही आमच्यासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. या सिनेमाद्वारे आम्ही इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत असेही अभिषेकने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER