इरफान व हरभजन यांनी न बोलताच धोनीवर साधला निशाणा..!

Irfan Pathan-Dhoni-Harbhajan singh

तुम्ही कितीही यशस्वी असू द्या, कोट्यवधी लोकांच्या गळ्यातील ताईत असू द्यात पण सर्वच तुमचे प्रशंसक असतीलच असे नाही. विरोधक, टीकाकार हे असणारच. विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत (M S Dhoni) हेच घडतंय. हैदराबादविरुध्दच्या (SRH) सामन्यातील त्याचा थकवा, त्याला लागलेली धाप हे प्रकार बघता कुणी कधी बॕटही हाती धरली नाही असे लोक ‘माही’ला आता सन्मानाने निवृत्तीचा सल्ला देऊ लागले आहेत. एवढेच नाही तर ‘माही’चे काही माजी सहकारी खेळाडूसुध्दा त्याच्याकडे अप्रत्यक्ष बोट दाखवू लागले आहेत. जिमी निशॕम (Jimmy Nisham) व आकाश चोप्रा (Akash Chopra) यांच्यादरम्यानचे शाब्दिक युध्द ह्यासाठी कारण ठरले आणि त्याचे निमित्त साधून युसूफ पठाण ( Yusuf Pathan) व हरभजनसिंग (Harbhajan Singh) यांनी नेम साधला आहे. या दोघांनीही आपल्या या माजी कर्णधाराचे थेट नाव घेतलेले नसले तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे स्पष्टच आहे.

सुरुवात झाली ती आकाश चोप्राच्या व्टिटपासून. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा अष्टपैलु जिमी निशॕमच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे मॕचविनर नसलेले खेळाडू संघात कसे काय स्थान मिळवतात असा प्रश्न त्याने केला होता. मात्र याला निशॕमने लगेच उत्तर दिले आणि आकाश चोप्राची आकडेवारीच मांडली. निशॕमने म्हटले की ज्यांची सरासरी फक्त 18.5 आहे आणि स्ट्राईक रेट 90 चा आहे तेसुध्दा सामने जिंकून देऊ शकत नाहीत. यालाही आकाशने प्रत्युत्तर दिले. त्यात म्हटलेय की मित्रा, तु म्हणतोस ते बरोबर आहे आणि म्हणूनच आता कुणी मला संघात घेत नाही पण दुसऱ्या कामांसाठी मला लोक विचारतात. मला आनंद आहे की, तुला माझ्या निरिक्षणांवर आक्षेप नाही फक्त माझ्या आकडेवारीला आहे. आयपीएलच्या पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा.

निशॕमला तीन सामन्यांत फक्त एकच विकेट मिळाली असून त्याने धावासुध्दा फक्त सात धावा केल्या आहेत.

हे निमित्त झाले आणि इरफान पठाण व हरभजनसिंग यांच्या काॕमेंट आल्या. इरफानने आपल्या व्टिटमध्ये म्हटले की, वय ही काहींसाठी फक्त एक संख्या असते पण इतर काहींसाठी ते संघातुन वगळण्याचे कारण असते. लगेच इरफानच्या या ट्विटच्या समर्थनात हरभजनसिंगचे व्टिट आले. त्यात त्याने म्हटले की, तुझ्याशी 10 लाख टक्के सहमत.

हैदराबादविरुध्दच्या सामन्यात पराभवात धोनी 47 धावांवर नाबाद राहिला मात्र यादरम्यान धावा घेताना तो अतिशय थकलेला दिसला आणि त्याला धापसुध्दा लागत होती असे दिसुन आले. त्याला डिहायड्रेशनचाही त्रास होत होता आणि त्याला वैद्यकीय मदतसुध्दा घ्यावी लागली. हे बघूनच 39 वय पार केलेल्या धोनीचा जोश आता गेला, त्याने निवृत्ती घ्यायला हवी अशी चर्चा सुरु झाली. पहिल्या सामन्यातही पराभव स्पष्ट झाल्यावर धोनीने तीन षटकार मारल्यावर आणि आधी संथ फलंदाजी केल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती.

हरभजनने यंदा कौटुंबिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे मात्र तो पाच वर्षांपासुन भारतीय संघाबाहेर आहे. त्यामुळे इरफानच्या समर्थनातील त्याचे व्टिट बरेच काही बोलून जाणारे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER