वसिम जाफरचे टीकाकार तोंडघशी; अब्दुल्ला म्हणाला, मौलवींना परवानगीनेच बोलावले

Iqbal Abdullah - Wasim Jaffer

वसिम जाफरच्या (Wasim Jaffer).उत्तराखंड (Uttarakhand) प्रशिक्षकपदाच्या राजिनाम्यासंदर्भात होणाऱ्या जातीयवादाच्या वादात नवनवीन खुलासे होत आहेत. आता सैयद मुश्ताक अली ट्राॕफी साठी उत्तराखंडच्या संघाचा कर्णधार इक्बाल अब्दुल्लाने (Iqbal Abdullah) जी काही माहिती मांडली आहे त्यानुसार वसिम जाफर जे काही सांगतोय त्यात तथ्य असल्याचे आणि त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप शंकास्पद असल्याचे दिसून येत आहेत.

उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, वसिम जाफरने बायोबबल तोडून शुक्रवारी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये मौलवींना (Maulavi) बोलावले होते पण आता इकबाल अब्दुल्लाने स्वतःच सांगितलेय की, संघव्यवस्थापक नवनीत मिश्रा यांच्या परवानगीनेच मौलवींना ड्रेसिंग रुममध्ये आणले होते. गेल्या महिन्यात देहराडून येथे संघाच्या सराव सत्रावेळी शुक्रवारच्या नमाजासाठी ड्रेसिंग रुममध्ये मौलवींना आमंत्रित करण्यात आले होते पण त्यासाठी संघव्यवस्थापकांची परवानगी घेण्यात आली होती.

यासंदर्भात जातीयवादाचे आरोप झाल्यावर उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव महिम वर्मा यांनी बायोबबल नियमावलीचा भंग झाल्याबद्दल संघव्यवस्थापकांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जाफरनेच मौलवींना ड्रेसिंग रुममध्ये बोलावले होते अशी माहिती खेळाडूंनी आपल्याला दिल्याचे वर्मा यांनी म्हटले होते पण आता अब्दुल्लाने आपणच मौलवींना संघव्यवस्थापकांच्या परवानगीने बोलावल्याचे म्हटले आहे.

अब्दूल्लाने म्हटलेय की, मौलवींशिवाय शुक्रवारी नमाज अदा होत नाही. दुपारी सराव आटोपल्यावरच आम्ही नमाज अदा केली. त्यासाठी मौलवींना बोलावता येईल का, असे मी आधी वसिमभाईंना विचारले होते पण त्यांनी मला संघ व्यवस्थापकांची परवानगी घेण्याचे सुचवले होते. त्यानंतर मी व्यवस्थापक नवनीत मिश्रांना विचारले तेंव्हा ते म्हणाले की, कोई नही इकबाल, प्रेयर-धरम फर्स्ट. त्यांनी परवानगी दिल्यानेच मौलवींच्या मार्गदर्शनात आम्ही नमाज अदा केली होती.

अब्दुल्लाने अधिक माहिती देताना सांगितले की मौलवींना दोन वेळा आमंत्रित करण्यात आले होते. बायो बबल असते तर संघव्यवस्थापकांनी मला परवानगी दिली असती का? आणि त्यांनी नकार दिला असता तर मी मौलवींना आणले असते का? या मुद्द्यावर वसिम जाफर यांच्यावर झालेले आरोप बघून आपल्याला दुःख झाल्याचे त्याने म्हटले आहे.

त्याने म्हटलेय की, वासिमभाईंनी संघाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांनी कधीही जातींचा मुद्दा आणला नाही. कोणत्याही क्रिकेटपटूला असले आरोप ऐकायला आवडणार नाही. ते फार व्यथीत झाले आहे. खऱ्या प्रश्नांपासून भरकटवण्यासाठी असले आरोप करण्यात आल्याचे इकबाल अब्दुल्लाने म्हटले आहे. त्याने जाफर यांच्यावर हिंदू देवतांच्या घोषणा देण्यास मनाई केल्याबद्दलचेही आरोप फेटाळून लावले. उलट त्यांनी ‘उत्तराखंड’ च्या नावानेच जयघोष करण्यास सांगितले. सराव शिबिरात आम्ही बार बार हां, बोलो यार हां, अपनी जीत हो, उनकी हार हां असे गायचो. जय श्रीराम, जो बोले सो निहाल, गो ग्रीन, गो उत्तराखंड, चलो उत्तराखंड, चलो रिषीकेश अशा 50 घोषणा आम्ही तीन महिन्यांच्या सराव शिबिरात दिल्या असेही अब्दुल्लाने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER