सद्यस्थितीत आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य? सोशल मीडियावर विचारांचे महायुध्द

Maharashtra Today

कोरोनासारख्या (Corona) राष्ट्रीय आपत्तीच्या (Pandemic) काळात सारा देश संकटात असताना आयपीएलसारखी (IPL) क्रिकेटची (Cricket) स्पर्धा खेळवावी की नाही, याबद्दल सोशल मीडियावर जोरदार वाद-प्रतिवाद सुरू आहेत. आॕस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आक्रमक यष्टीरक्षक- फलंदाज अॕडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याचे एक व्टिट आणि एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने आयपीएलच्या बातम्या प्रसिध्द न करण्याचा निर्णय घेतल्याने ह्या मुद्द्याने आणखी हवा पकडली आहे. मात्र चोहीकडून नकारात्मक बातम्या येत असताना आणि भीतीदायक वातावरण असताना लोकांना दुःख व चिंता विसरून ताणतणावापासून विरंगुळ्याचे काही क्षण आयपीएलमुळे मिळतात आणि त्यानिमित्ताने का होईन, लोकं संध्याकाळी विनाकारण न फिरता घरात बसून आहेत त्यामुळे आयपीएलचे समर्थन करणारे अधिक आहेत. मात्र दररोज एवढे लोक मृत्युमूखी पडत असताना राष्ट्रीय दुखवट्यासारखी परिस्थिती असताना आयपीएलसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम करणे कितपत योग्य आहे असा सवालही काहींनी केला आहे.

अॕडम गिलख्रिस्टने आपल्या व्टिटमध्ये म्हटलेय की, भारतातील सर्वांना सदिच्छा. कोविडचे आकडे भीतीदायक आहेत आणि आयपीएल सुरू आहे. चुकीचे वाटते? की दररोज रात्री लोकांचे लक्ष इतरत्र वळण्याचे हे साधन आहे? याविषयावरा तुमचेकाहीही मत असो, माझ्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.

त्यानंतर इंग्रजी वर्तमानपत्रांच्या एका आघाडीच्या समूहानेसुध्दा देशात जोवर काही प्रमाणात का होईना साधारण स्थिती येत नाही तोवर आयपीएलशी संबंधीत बातम्या प्रसिध्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलेय की मुद्दा खेळाचा नाही तर ज्यावेळी हे खेळ खेळले जात आहेत त्याचा आहे. देश संकटात असताना क्रिकेटचा उत्सव बायोबबलच्या संरक्षणात का होईना, साजरा करणे ही असंवेदनशील व्यावसायिकता आहे. क्रिकेटनेसुध्दा मान्य करायला हवे की आपण अभूतपूर्व संकटातून जात आहोत. म्हणून जीवन मृत्यूच्या प्रश्नांवर देशाचे लक्ष कायम रहावे म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे या समूहाने म्हटले आहे.

यावर साहजिकच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे व्यक्त झाले आहेत. या मुद्द्यावर आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूने भूमिका मांडलेली नाही किंवा घेतलेली नाही याकडेही लोकांनी लक्ष वेधले आहे मात्र शेतकरी आंदोलनावेळी मात्र शेतकऱ्यांच्या समर्थनात आंतरराष्ट्रीय पातळीवरून समर्थन मिळू लागल्यावर काही नावाजलेल्या क्रिकेटपटूंनी हा आमचा अंतर्गत मामला आहे त्यात इतरांनी नाक खूपसू नये अशी भूमिका घेतली होती पण आता हे क्रिकेटपटू का गप्प आहेत असा सवालही काहींनी केला आहे. भारतात निवडणूका, क्रिकेट आणि बॉलीवूडबद्दल प्रश्न उपस्थित करणे हा मुर्खपणा असल्याची नाराजी एकाने व्यक्त केली आहे.

आयपीएलच्या केवळ 10 टक्के रक्कम जरी आरोग्य व समाजकल्याणासाठी वापरली तर किती भले होईल पण इतर सर्व पीडा भोगत असताना क्रिकेट मात्र सुरु आहे अशी नाराजी एकाने व्यक्त केली आहे. लोकांना काहीही झाले तरी यांना काही फरक पडत नाही. देशभरात हजारो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना आपण विजय, षटकार-चौकार, विकेट साजरे करत आहोत असा विरोधाभास एकाने मांडला आहे. टायटॕनिक बूडत असताना एक जण व्हायोलीन वाजवत बसला होता तसे आयपीएलचे आहे. देशात जणू काही घडलेच नाही अशा थाटात काॕमेंटेटर्स वर्णन करत असतात ही गंमतच आहे अशी टीका एकाने केली आहे. यांना जीवापेक्षा, क्रिकेटपटूंनासुध्दा पैसा प्यारा असल्याची नाराजी एकाने व्यक्त केली आहे. खेळायला हरकत नाही पण किमान जाणाऱ्या जीवांपोटी संवेदना म्हणून श्रध्दांजली तरी वाहा, किमान काळ्या पट्ट्या तरी लावा, एवढे तर करा असे एकाने सुनावले आहे.

आयपीएलचे सामर्थन करणारे म्हणतात की सद्यस्थितीत आयपीएलचे सामने बघणे हीच एक सकारात्मक बाब उरली आहे, बाकी सगळीकडे चिंता, दुःख आणि निराशा आहे. जे काळजी घेत आहेत आणि खबरदारी बाळगत आहेत त्यांच्यासाठी हे चांगले मनोरंजन व लक्ष दुसरीकडे वळवण्याचा उत्तम मार्ग आहे. आयपीएलमुळे नकोनकोसे विचार दूर होतात आणि सततच्या ताणतणावात काही मनोरंजनही होते. शिवाय त्यामुळे लोकं घरात थांबून असतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदतच होत आहे. म्हणून उलट दोन दोन सामने खेळवायला हवेत अशी मागणी एकाने केली आहे. लोकांना नैराश्य व भीतीतून बाहेर काढण्यासाठी आयपीएल उपयोगी असून ते बायोबबल मध्ये खेळत आहेत, शिवाय प्रेक्षकांशिवाय खेळत आहेत, गर्दीचा प्रश्नच नाही आणि बऱ्याच लोकांना रोजगारही मिळतोय त्यामुळे विरोध कशासाठी तेच कळत नाही असे काहींना वाटते.

एका कोरोना बाधिताने म्हटलेय की मी 10 दिवस क्वारंटाईन होतो. आयपीएलने माझे मनोरंजन तर केलेच, मनस्थितीसुध्दा चांगली राखली. सर्वत्र , बातम्या-टेलिव्हिजन व सोशल मीडियात दुःखद व निराशाजनक बातम्या असताना आयपीएल ही पॉझिटीव्ह गोष्ट आहे. एका आयपीएल समर्थकाने म्हटलेय की निवडणूका चालतात, कुंभमेळा चालतो मग आयपीएल का नको. आजची परिस्थिती ही राजकीय अनास्थेमुळे आहे. आयपीएलमध्ये बायोबबल व प्रेक्षकांना बंदी असे सर्व नियम पाळले जात आहेत. एका डॉक्टरने म्हटलेय की दिवसभर थकल्यानंतर आयपीएलच्या माध्यमातून थोडेफार मनोरंजन होते. आजुबाजूला काहीच चांगले घडत नसताना बघण्यासारखी ही एकच गोष्ट आता उरली आहे. आणि आयपीएलमुळे घरात राहून काही लोकांचे प्राण वाचत असतील तर ते चांगलेच आहे.

एकाने म्हटलेय की साधारण स्थितीत खेळ लोकांना जोडायचे काम करतात असे म्हटले जायचे पण आताच्या स्थितीत आयपीएलने लोकांना शारीरिकदृष्ट्या लांब लांब ठेवले आहे आणि मानसिकदृष्ट्या जोडलेले आहे ही फार चांगली गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button