आयपीएलचे सामने मर्यादेपेक्षा लांबताहेत, बुधवारचा सामना तासभर लांबला

IPL

आयपीएलचा (IPL) बुधवारचा मुंबई इंडियन्स (MI) व कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना तसा एकतर्फीच झाला. यात रोहित शर्माची (Rohit Sharma) फलंदाजी व जसप्रित बूमराची (Jaspreet Bumrah) गोलंदाजी या गोष्टी जशा लक्षात राहणाऱ्या होत्या तसेच हा सामना निर्धारीत वेळेपेक्षा तब्बल तासभर जास्त (Extra Time) वेळ चालला हीसुध्दा लक्षात राहणारी व खटकणारी बाब ठरली.

सामना संध्याकाळी साडेसातला सुरू झाला आणि रात्री 11.46 ला संपला. म्हणजे तब्बल सव्वा चार तास आणि निर्धारीत वेळ आहे तीन तास 10 मिनिटांची. पाच-पाच मिनिटे सवलतीचे धरले तरी निश्चित वेळेपेक्षा सामना तासभर जास्तच चालला.

या सामन्याचा पहिला डाव दोन तास पाच मिनिटे चालला. निश्चित वेळ आहे एक तास 25 मिनिटांची म्हणजे तब्बल 40 मिनिटे जास्त या डावाला लागली. नियमानुसार डावाला अधिकात अधिक 90 मिनीटेच लागायला हवीत.

या लांबलेल्या डावात मुंबई इंडियन्सने 5 बाद 195 धावा केल्या. त्यादरम्यान कोणत्या खेळाडूला दुखापत नाही, इजा नाही, बॕट किंवा चेंडूची किंवा इतर साहित्याची रिप्लेसमेंट नाही. म्हणजे वेळ वाया जाण्याची कारणे नव्हती. पण मग एवढा वेळ का लागावा?

याची तीन कारणे दिसुन आली. पहिले म्हणजे या डावात 14 अवांतर धावा निघाल्या. त्यात 11 वाईड व एक नोबाॕल होता. म्हणजे दोन षटके जादा गोलंदाजी झाली. दुसरे कारण म्हणजे षटकारासाठी फटकावला गेल्यावर चेंडू तीनवेळा बदलावा लागला आणि तिसरे म्हणजे रोहित शर्माला क्षेत्ररक्षकाकडून थ्रो’वर चेंडू लागला तेंव्हा काही वेळ गेला पण तरीसुध्दा 40 मिनीटे डावाला उशिर व्हावा अशी ही कारणे नव्हती.

आयपीएलच्या नियमांत स्पष्ट म्हटलेय की, पहिल्या डावात वेळ अधिक गेला असेल तर सामनाधिकारी मध्यंतराची 20 मिनिटांची वेळ कमी करू शकतात मात्र बुधवारी तसेसुध्दा करण्यात आले नाही.

मंगळवारी राजस्थान राॕयल्सने 7 बाद, 216 धावा केलेला डावसुध्दा एक तास 45 मिनिटात आटोपला होता. तेंव्हासुध्दा निश्चित वेळेपेक्षा 20 मिनिटे अधिक वेळ लागला.

आयपीएल ही पूर्णपणे व्यावसायिक स्पर्धा असल्याने इथे प्रत्येक मिनीट महत्त्वाचा असतो. जाहिरातदार, ब्रॉडकास्टर, समालोचक आणि सामना बघणारी जनता प्रत्येकाचा मिनीट न् मिनीट महत्त्वाचा आहे. रात्री 11 नंतर सामना बघणारांची संख्या घटते असा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे हा उशीर जाहीरातदार व ब्राॕडकास्टर्सना नुकसानदायक असतो. हेच ध्यानात घेऊन व युएईत हे सामने होत आहेत हे ध्यानात घेत सामन्यांची वेळ लवकरची करण्यात आली आहे.

बुधवारचा सामना 11.46 वा संपला. निश्चित वेळ 11.40 वाजेची होती त्यावेळी केकेआरच्या डावातील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. याउलट दिल्ली कॕपिटल्स व किंग्ज इलेव्हनच्या सामन्यात सुपर ओव्हर 11.40 वाजताच म्हणजे योग्य वेळी सुरु झाले होते.

आता या उशीराबद्दल काय कारवाई होते तर,फ्रँचाईजींना दंड केला जातो पण धनाढ्य फ्रँचाईजी संघाच्या बाजूने राहण्यासाठी त्याची फारशी पर्वा करत नाहीत.

मैदानात खेळला जाणारा सामना आणि टेलिव्हिजनवर दिसणारा सामना यात फक्त 8 ते 9 सेकंदाचे अंतर असते आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन ती वेळसुध्दा कमीत कमी केली जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा सेकंदा सेकंदाच्या लढाईत डावाला 40 मिनीटे उशीर म्हणजे खूपच झाला. याला उपाय म्हणजे दंडाची रक्कम खूप वाढवली पाहिजे,असे तज्ज्ञांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER