ख्रिस मॉरिस म्हणतो, आयपीएलमध्ये समाधान नाही हे डेल स्टेनचे वैयक्तिक मत!

Dale Steyn-Chris Morris

आयपीएलमध्ये (IPL) पैसा भरपूर मिळतो, सर्व विषय पैशांचाच असतो पण एक खेळाडू म्हणून एखाद्या क्रिकेटपटूला जे समाधान मिळायला हवे, जो आनंद मिळायला हवा तो जगातील इतर लीग स्पर्धांच्या तुलनेत कमीच असतो असे विधान काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने व्यक्त केले होते. पाकिस्तान सुपर लिग (PSL) वा लंकन सुपर लिगशी (LSL) इंडियन प्रीमियर लिगची तुलना करताना त्याने हे मत मांडले होते. मात्र त्याचाच दक्षिण आफ्रिकन (South Africa) अष्टपैलू सहकारी आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस माॕरिस (Chris Morris) याने मात्र या मताशी असहमती दर्शवली आहे.

माॕरिसने म्हटलेय की डेलची ही वैयक्तिक मते आहेत. वैयक्तिक मते वेगळी असू शकतात पण मला तसे वाटत नाही. डेल हा मनमौजी माणूस आहे, तो एक महान क्रिकेटपटू आहे, माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी तो एक आहे, पण ही डेलची त्याची स्वतःची मते आहेत. आपली मते स्पष्टपणे मांडण्यासाठी तो प्रसिध्द आहेच. तो डेलचा स्वभावच आहे. मी त्यात जास्त खोलवर जाणार नाही. त्यावेळी डेलला भावनिक, मानसिक व शारीरिकदृष्ट्या जे वाटले ते त्याने मांडले. या विषयावर आम्ही एकमेकांशी बोललोसुध्दा आहोत पण आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत आणि आमची मते स्वतंत्र व वेगवेगळी आहेत. जगभरात असेच आहे, असे म्हणत ख्रिस मॉरिसने आपली असहमती स्पष्ट केली आहे.

ख्रिस मॉरिस हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. यंदाच्या मोसमात त्याच्यासाठी राजस्थान राॕयल्सने तब्बल सव्वा सोळा कोटींची किंमत मोजली आहे. तर आयपीएलमध्ये राॕयल चॕलेंजर्सकडून खेळलेला डेल स्टेन यंदा पीएसएलमध्ये क्वेट्टा ग्लॕडिएटर्सकडून खेळला होता आणि त्यानंतर त्याने आयपीएलबद्दल हे मत व्यक्त केले होते.

गंमत म्हणजे आयपीएलच्या इतिहासात मॉरिसला सर्वाधिक किंमत मिळाली असली तरी दक्षिण आफ्रिकन संघात मात्र त्याचे स्थान निश्चित नाही. आयपीएलमध्ये माॕरिसला नेहमीच पसंती राहिली आहे. त्यामुळे त्याला किंमतसुध्दा चांगली मिळत आली आहे. 2013 मध्ये तो पहिल्यांदा आयपीएल खेळला त्यावेळी तो फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता मात्र तरीसुध्दा त्याला चेन्नई सुपर किंग्जने 6 लाख 25 हजार डाॕलरची किंमत दिली होती आणि आता यंदा राजस्थान राॕयल्सने जवळपास 22 लाख अमेरिकन डाॕलरएवढी किंमत मोजली आहे. यंदाच्या लिलावात त्याला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचाईजींदरम्यान, विशेषतः राॕयल चॕलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान राॕयल्स दरम्यान जी चढाओढ लागली होती त्याबद्दल तो म्हणाला की ते बघून तर माझा श्वासच रोखला गेला होता. मला एवढी किंमत मिळेल असे मला वाटलेच नव्हतेआणि एवढ्या साऱ्या संघांची मला पसंती असेल असेसुध्दा वाटले नव्हते. हे बघून मला फार समाधान वाटले. आणि लिलावात जे घडले ते तर माझ्या कल्पने पलीकडचे होते.

आयपीएल 2020 ते आयपीएल 2021 दरम्यानच्या सहा महिन्यांत मॉरिस एकसुध्दा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तरीसुध्दा त्याच्या अष्टपैलू योगदानाच्या आशेने राजस्थान राॕयल्सने आपला खजिनाच उघडला. आपल्या आक्रमक फलंदाजी व गोलंदाजीसाठी बिग बॕश लीग, आयपीएल आणि टी-20 ब्लास्ट या स्पर्धांमध्ये तो ‘डिमांड’मध्ये असतो.

यंदा तो आठव्यांदा आयपीएलमध्ये खेळणार असून 2015 नंतर तो राजस्थान राॕयल्सच्या तंबूत परतला आहे.

मी एवढ्या आयपीएल खेळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. एवढ्या वर्षात आपली मागणी कायम राहणे हीच माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. कामगिरी करुन दाखवावी लागते हे महत्त्वाचे आहे. संघासाठी योगदान देताना आनंदही घेता आला पाहिजे. यंदा विक्रमी किंमत मिळाली असली तरी त्याचे दडपण आपल्या खेळावर येऊ देणार नाही, असे माॕरिसने म्हटले आहे.

आयपीएल हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव आहे. यात जगभरातील आघाडीच्या खेळाडूंसोबत खेळायचा जो अनुभव मिळतो तो अनमोल ठेवा आहे. प्रत्येकवेळी आयपीएलमध्ये खेळायचा अनुभव वेगळाच असतो. पुढच्या नऊ आठवड्यात आणखी वेगळा अनुभव राहिल असे तो म्हणतो.

यंदा भारतातच होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी यंदाची आयपीएल रंगीत तालिम मानली जात असली तरी माॕरिस त्याच्याशी सहमत नाही. आपले लक्ष राजस्थान राॕयल्ससाठी आधिकाधिक योगदान देण्यावर असेल. विश्वचषक असो वा नसो, आमचे टारगेट आयपीएल विजेतेपद असेल. विश्वचषकानंतर ही दुसरी सर्वात मोठी प्रतिष्ठेची ट्राॕफी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले तर आयपीएल ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. साऱ्या जगाचे लक्ष तुमच्यावर असते. आणि तुम्हाला किंमत काहीही मिळो, मैदानावर कामगिरी तुम्हाला दाखवावीच लागणार , असे माॕरिसने म्हटले आहे.

2019 च्या विश्वचषकापासून तो आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळायला मिळेल का, या विषयावर तो मौन बाळगून आहे. त्या दृष्टीने मी विचारच केलेला नाही असे तो सांगतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button