आयपीएलचे ठरले पण स्थानिक क्रिकेटपटूंना अर्थसहाय्याचे काय? मंडळाच्या दुर्लक्षाने नाराजी

BCCI - IPL 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. त्यात आयपीएलचे (IPL) उर्वरीत सामने युएईमध्ये (UAE) घेण्याबाबतचा निर्णय झाला. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा झाली पण कोरोनामुळे राष्ट्रीय स्तरावरच्या रणजी (Ranji) व इतर स्पर्धांचे सामने न झाल्याने खेळाडू, पंच, स्कोअरर, व्हिडिओ अॕनालिस्ट यांना नुकसान भरपाई देण्याबाबत (Compensation) किंवा अर्थसाहाय्य (Financial Aid) करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने होणार याचा एकीकडे आनंद साजरा होत असला तरी दुसरीकडे क्रिकेटची ती दुनिया जी फारशी झगमगाटात नाही, ती मात्र चिंतेत आहे आणि कमाईच ठप्प झाल्याने उदरनिर्वाह कसा चालावयचा याची चिंता त्यांना सतावतेय.

वास्ताविक बीसीसीआयने हा मुद्दा अग्रक्रमाने चर्चेला घ्यायला हवा होता पण प्राप्त माहितीनुसार एका सदस्याने हा मुद्दा चर्चेला आणण्याचा प्रयत्न केला असता त्याला हा विषय अजेंड्यावर नाही असे सांगून गप्प बसविण्यात आले आणि आयपीएल व टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबतच फक्त चर्चा झाली. सौरव गांगुलीसारखा सर्व प्रकारचे आणि सर्व थराचे क्रिकेट खेळलेली व्यक्ती अध्यक्षपदी असताना एवढ्या गंभीर विषयाकडे लक्ष दिले जात नसल्याने नाराजी आहे, क्रिकेट जगतात निराशा आहे.

एकीकडे आयपीएलचे आयोजन करून मंडळ दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे आता कदाचित पैसे न मिळाल्याने चिंतीत असलेल्या 700 स्थानीक खेळाडूंना देण्यासाठी मंडळाकडे पैसे येतील अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ पत्रकार रिका राॕय यांनी केली आहे तर आणखीन एक ज्येष्ठ पत्रकार बी. वेंकट कृष्णा यांनी चांगली नोकरी सोडून पंचगिरीकडे वळलेल्या पंचाच्या हालअपेष्टांसह स्कोअरर व इतरांच्याही व्यथा मांडल्या आहेत. परदेशी माध्यमांनीही गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या महिला संघातील खेळाडूंना त्यांचे पैसे मिळालेले नसल्याची बाब समोर आणली होती.

यंदा रणजी स्पर्धा, दुलीप ट्राॕफी व इराणी ट्रॉफी या प्रथम श्रेणी स्पर्धांचे सामने झालेच नाहीत त्यामुळे राष्ट्रीय संघ व आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या शेकडो स्थानिक खेळाडूंचा कमाईचा मार्गच बंद झाला. केवळ मुश्ताक अली ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफीचे सामने झाले. त्यामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, पंच, स्कोअरर, व्हिडिओग्राफार्स अशा मंडळींची कमाईच बंद झाली.

यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटलेय की या खेळाडूंना नुकसान भरपाई मिळणारच आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याचा निर्णय झालेला आहे. त्यानुसार मोसमाच्या शेवटी, जेंव्हा त्यांचे मानधन दिले जाते, तसेच त्यांना भरपाईची रक्कमसुध्दा मिळेल. मात्र ही रक्कम नेमकी किती व कधी दिली जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

यासंदर्भात लावलेल्या हिशेबानुसार जगातील या सर्वात धानाढ्य क्रिकेट मंडळाला फार मोठा खर्च येणार नाहीये. जाणकारांनुसार 50 ते 55 कोटींची रक्कम पुरेशी ठरणार आहे. पुरुष संघात 20 खेळाडू पकडले आणि प्रत्येकाला साडेचार लाख रुपये नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे महिला खेळाडूंना प्रत्येकी अडीच लाख रुपये भरपाई जरी दिली तर ती रक्कम मिळून 50 कोटीच्या आसपासच होते असे मंडळातीलच जाणकारांनी गणित मांडले आहे पण ते देण्यासाठीही मंडळाकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने निराशा आहे. आयपीएलचे उर्वरीत सामने होणार असल्याने प्रक्षेपकांकडून मंडळाला शिल्लक 1500 कोटी रुपये मिळणार आहे. त्यातून हे सहज शक्य आहे पण ते कधी होईल याच्या प्रतिक्षेत आता भारतातील क्रिकेटपटू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button