आयपीएल लिलावांतील हे विक्रम बघाल तर थक्क व्हाल..!

IPL auction's stupendous records

आयपीएल 2021 (IPL 2021) साठी गुरुवारी चेन्नईत पार पडलेला लिलाव हा मेगा आॕक्शन (Mega Auction) नसला तरी यातील उलाढालीने ‘मेगा रेकाॕर्डस्’ मात्र निश्चितच केले. त्यात ख्रिस माॕरिसला (Chris Morris) आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किंमत – 16.25 कोटी- मिळाली हे तर आता सर्वांनाच माहित आहे पण आयपीएलसाठी एकाच लिलावात चार खेळाडूंना 14 कोटींपेक्षा अधिक किंमत मिळाल्याची ही पहिलीच वेळ होती.

14 कोटींच्यावर चार पहिल्यांदाच

याच्याआधी आयपीएलच्या कोणत्याही लिलावात एकापेक्षा अधिक खेळाडूंना 14 कोटींच्यावर किंमत मिळाली नव्हती. मात्र यंदा ख्रिस माॕरिस, काईल जेमिसन (Kyle Jamieson) , झे रिचर्डसन (Jhye Richardson) व ग्लेन मॕक्सवेल (Glenn Maxwell) या चार जणांना 14 कोटींच्यावर किंमत मिळाली.

याच्याआधी 14 कोटींच्यावर ज्यांना किंमत मिळाली होती त्यात 2020 मध्ये पॕट कमिन्स, 2017 मध्ये बेन स्टोक्स आणि 2014 व 2015 मध्ये युवराजसिंग होते पण एकाच लिलावात एकापेक्षा अधिक खेळाडू एकदाही नव्हते.

आरसीबीने पाडला पैशांचा पाउस

ज्याप्रकारे याच्याआधी 14 कोटीपेक्षा अधिक किंमत एकाच लिलावात दोनसुध्दा खेळाडू नव्हते, त्याचप्रमाणे एवढी प्रचंड रक्कम मोजून एकापेक्षा अधिक महागडे खेळाडू आपल्याकडे घेणारे संघसुध्दा नव्हते. मात्र यंदा राॕयल चॕलेंजर्स बंगलोरने (RCB) जेमीसन (15 कोटी) व मॕक्सवेल (14.25 कोटी रुपये) यांच्यासाठी पैशांचा पाऊस पाडून हासुध्दा विक्रम केला.एवढेच नाही तर 2014 मध्ये त्यांनी युवराजसिंगसाठी 14 कोटी मोजले होते. याप्रकारे 14 कोटी किंवा अधिक रक्कम मोजून एकापेक्षा अधिक खेळाडू आपल्या संघात घेणारा आरसीबी हा एकमेव संघ आहे.

इतर संघांनी 14 कोटींच्यावर रक्कम मोजून फक्त एकएकच खेळाडू आपल्या संघात घेतलाय. त्यात राजस्थान राॕयल्स (ख्रिस माॕरिस 2021), दिल्ली कॕपिटल्स (युवराजसिंग 2015), कोलकाता नाईट रायडर्स (पॕटरसन कमिन्स 2020), रायाझिंग पुणे सुपरजायंटस् (बेन स्टोक्स 2017) आणि किंग्ज पंजाब (झे रिचर्डसन 2021) यांचा समावेश आहे.

माॕरिस नाही, विराटच सर्वात महागडा

ख्रिस माॕरिसने लिलावात सर्वाधिक किंमत मिळवण्याचा युवराजसिंगचा 2015 मधील विक्रम 25 लाखांनी मोडला असला तरी तो विराट कोहलीच्या (Virat Kohli) मागेच आहे. फरक एवढाच की कोहलीला लिलावात नाही तर आपल्या संघात कायम राखण्यासाठी 2018 मध्ये राॕयल चॕलेंजर्स बंगलोरने 17 कोटी मोजले होते.

मॕक्सवेल ओढतोय खोऱ्याने पैसे

यंदाच्या लिलावानंतर ग्लेन मॕक्सवेलबद्दल ज्येष्ठ पत्रकार जाॕय भट्टाचार्य यांचे एक व्टिट आले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, मॕक्सवेलच्या कामगिरीबद्दल मी प्रश्न उपस्थित करणे चुकीचेच होते कारण 2013 पासून त्याने सातत्याने सुधारणाच दाखवली आहे फक्त ती मैदानावरील कामगिरीत नाही तर आयपीएलमधील लिलावात आहे एवढेच! 2013 मध्ये 5 कोटी 30 लाख रुपयांपासून आता 14 कोटी 25 लाखांपर्यत…ही सुधारणा नक्कीच आहे.

भट्टाचार्य यांच्या या व्टिटमध्ये तथ्य नक्कीच आहे कारण मॕक्सवेल हा आयपीएलच्या लिलावांतून सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.त्याने आतापर्यंत पाच लिलावात मिळून 45 कोटी 30 लाखांची किंमत मिळवली आहे. आता फक्त युवराज सिंग (Yuvraj Singh) त्याच्यापुढे आहे. युवराजने सहा लिलावात मिळून 48 कोटी 10 लाखांची किंमत मिळवली आहे.

मॕक्सवेलची चढती किंमत (रुपयांमध्ये)

2013- 5 कोटी 32 लाख
2014- 6 कोटी
2018- 9 कोटी
2020- 10.75 कोटी
2021-14.25 कोटी

या यादीत युवराज व मॕक्सवेलनंतर दिनेश कार्तिकला सहा लिलावातून 38.85 कोटी तर यंदाच सव्वा सोळा कोटी मिळवलेल्य ख्रिस मॉरिसच्या नावावर आता पाच लिलावांतून 37.96 कोटी आहेत. मात्र विविध फ्रँचाईजींनी आपल्याकडे कायम राखण्यासाठी काही खेळाडूंना मोजलेल्या किंमती मिळवल्या तर ती रक्कम यापेक्षा अधिक असू शकते.

गौतम व मेरेडिथचा धमाका

आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या (uncapped) खेळाडू कृष्णाप्पा गौतमला (Krishnappa Gowtham) चेन्नई सुपर किंग्जने सव्वा नऊ कोटी मोजून अनकॕपड् खेळाडूसाठी सर्वाधिक किंमत मिळवण्याचा विक्रम केला. त्याच्याआधी अनकॕपड् खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सने 2018 मध्ये कृणाल पंड्यासाठी 8.8 कोटी तर 2016 मध्ये पवन नेगीसाठी दिल्लीने साडेआठ कोटी मोजले होते.

आॕस्ट्रेलियन रिली मेरेडीथ (Riley Meredith) याने पंजाब किंग्जकडून 8 कोटींची किंमत मिळवून परदेशी अनकॕपड् खेळाडूंसाठी विक्रमी किंमत मिळवली. याआधीचा विक्रम जोफ्रा आर्चरचा होता ज्याला 2018 मध्ये राजस्थान राॕयल्सने 7 कोटी 20 लाखांची किंमत दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER