कमाई कुणाची अधिक? ख्रिस मॉरिसची की कृष्णप्पा गौतमची?

Chris Morris and Krishnappa Gautam

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) ख्रिस मॉरिस (Chris Morris) हा 16.25 कोटीच्या किमतीसह सर्वात महागडा खेळाडू ठरल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यांच्या ‘बेस प्राईस’ (Base Price) शी तुलना केली तर हे स्पष्ट होते.

पंजाबकडून चेन्नई सुपर किंग्जकडे आलेला कृष्णप्पा गौतम याची बेस प्राईस होती 20 लाख आणि त्याला किंमत मिळाली 9.25 कोटी. म्हणजे आपल्या अपेक्षित किमतीच्या तब्बल 46.25 पट त्याने किंमत मिळवली आहे. ख्रिस मॉरिसने आपली बेस प्राईस 75 लाख ठेवली होती आणि त्याला मिळाले 16.25 कोटी. म्हणजे त्याला अपेक्षित किमतीपेक्षा 21.67 पट किंमत जादा मिळाली. यामुळे गौतमला मिळालेली किंमत 46.25 पट तर मॉरिसला मिळालेली किंमत 21.67 पट आहे हे पाहाता प्रत्यक्षात गौतम हा आयपीएल 2021 च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

हाच निकष लावला तर प्रत्यक्षात महागडे वाटणारे पहिले तीन खेळाडू ख्रिस मॉरिस (16.25 कोटी), काईल जेमिसन (15 कोटी) व ग्लेन मॕक्सवेल (14.25 कोटी) हे प्रत्यक्षात कृष्णप्पा गौतम (9.25 कोटी) पेक्षा फिकेच पडले आहेत.

याप्रकारे भारताच्या ‘अनकॕपड्’ (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या) खेळाडूंमध्ये सर्वाधिक किमतीचा विक्रम केलेल्या गौतमने बेस प्राईसच्या सर्वाधिक पट किंमत मिळवण्याचाही विक्रम केला आहे.

त्याच्याआधी हा सर्वाधिक पट किंमत मिळवण्याचा विक्रम 2016 मध्ये मुरुगन अश्विनच्या नावावर होता. 2016 च्या लिलावावेळी एम. अश्विनची बेसप्राईस होती 10 लाख रुपये आणि त्याला किंमत मिळाली होती साडेचार कोटी. याप्रकारे आपल्या अपेक्षित किमतीच्या तब्बल 45 पट किंमत त्याने मिळवली होती.

वरुण चक्रवर्तीलाही 2019 च्या लिलावावेळी 42 पट किंमत मिळाली होती. त्याने 20 लाखांची बेसप्राईस ठेवली होती आणि त्याला 8.4 कोटींची रक्कम मिळाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER