अखेर ‘सिक्सर किंग’ला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान; सचिनचा ‘मास्टरस्ट्रोक’

Yuvraj Sing -sachin

मुंबई :- आयपीएल लिलावात ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळख असलेल्या युवराज शिंगला यंदाच्या सिजनमध्ये त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच एक कोटी रुपयात अखेर मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले. काल मंगळवारी पहिला फेरीत त्याचा कुणीही वाली नव्हता मात्र आज बुधवारी दुसऱ्या सत्रात युवराजला मुंबईने जागा दिली. या निवडीत मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक असलेल्या सचिन तेंडुलकरचा मास्टरस्ट्रोक असल्याचे क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे.

युवराजने पहिल्याच टी-२० वर्ल्ड कपमध्ये एकाच षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार लगावले होते. तेव्हापासून त्याला ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळख मिळाली. यंदाच्या लिलावासाठी त्याची मूळ किंमत एक कोटी ठेवण्यात आली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत युवराजवर कुणीही बोली लावली नव्हती. त्यावेळी युवराज आता आयपीएलला मुकणार कि काय अशी चर्चा रंगली होती. पण मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सत्रात युवराजला आपल्या संघात सामील करून घेतले.

युवराज हा एक असा खेळाडू आहे की त्याला डिवचलं की तो पेटून उठतो. 2007 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात ही गोष्ट साऱ्यांनीच अनुभवली आहे. युवराजने खेचलेले सहा षटकार कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. 2011 साली भारताने जो विश्वचषक जिंकला त्यामध्येही युवराजचा सिंहाचा वाटा होता. विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने युवराजला गौरवण्यात आले होते.

yuvraj-sachin

युवराजला जेव्हा पहिल्या फेरीत कुणीही वाली मिळाला नाही तेव्हा साऱ्यांचेच डोळे विस्फारले गेले होते. दुसऱ्या फेरीत तरी युवराजला कुणी संघात घेणार का? असा सर्वानाच प्रश्न पडला होता. पहिल्या फेरीनंतर एक मोठा ब्रेक घेण्यात आला. लिलावाच्या ठिकाणी संघाच्या मालकिण नीता अंबानी होत्या. या ब्रेकच्यावेळी मुंबई इंडियन्सच्या लिलावातील संघाला सचिनने युवराजला संघात घेण्याबद्दल सांगितले. या महान खेळाडूचा मान ठेवत नीता अंबानी यांनी त्वरीत युवराजला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले, असे सूत्रांनी सांगितले आहे.

या समावेशामध्ये मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. काही का असेना मात्र युवराजचे क्रिकेट करिअर उद्वस्थ होण्यापासून वाचले, हे विशेष.