अखेर आयपीएल स्थगित : मंडळाची अधिकृत घोषणा

कोरोनाच्या (Corona) धुमाकुळाने बहुतेक क्रिकेटपटूंना ग्रासले असल्याने अखेर यंदाच्या आयपीएलचे (IPL) पुढील सर्व सामने अनिश्चित काळासाठी स्थगित (Suspended) करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती व संदीप वाॕरियर, चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि इतर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सोमवारचा केकेआर व आरसीबीचा सामना रद्द करण्यात आला होता.

त्यानंतर मंगळवारी सनरायझर्सचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा व दिल्लीचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा हेसुद्धा पॉझिटिव्ह आढळून आल्याने आयपीएल आयोजकांपुढे पर्यायच उरला नव्हता. आधीच बुधवारचा चेन्नई आणि राजस्थान दरम्यानचा सामनासुद्धा पुढे ढकलण्यात आला होता. साहा पॉझिटिव्ह आल्यानंतर सनरायझर्सचा मंगळवारचा सामना होणेसुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे अखेर आयपीएल २०२१ चे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि आता पुढचे सामने आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कार्यक्रम बघून घेण्यात येतील असे म्हटले आहे.

अंदाजानुसार आता यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतरच पुढचे सामने होऊ शकतील अशी चिन्हे आहेत. मात्र साधारण ८ ते १० दिवसांनंतर परिस्थिती बघून मुंबईत सामने आयोजित करता येतील का, याचासुद्धा विचार सुरू आहे. राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की, आम्ही सर्व संघ, ब्रॉडकास्टर्स आणि संबंधित सर्वांशी बोललो आहोत आणि त्यानंतरच त्यांच्या भावना व देशातील स्थिती लक्षात घेता स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी खेळाडूंच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे आणि सुरक्षितता आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

ही बातमी पण वाचा : मायकेल स्लेटरची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर आगपाखड, म्हणाला आमची पर्वाच नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button