एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आयपीएल- 2021

IPL 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2021 (IPL 2021) बद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी ही स्पर्धा बहुधा १० एप्रिलनंतरच होईल अशी चिन्हे आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कार्यक्रम पाहता त्याच्याआधी आयपीएल 2021चे आयोजन कठीणच दिसते.

भारत (India vs England) आणि इंग्लंड दरम्यानच्या सामन्यांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची ही मालिका भारतात खेळण्यात येणार आहे. त्यात ५ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान कसोटी सामने होणार आहेत. त्यानंतर १२ ते २० मार्चदरम्यान टी-20 सामने होणार आहेत आणि २८ मार्चला वनडे सामन्यांची मालिका संपणार आहे. दोन महिन्यांचा हा इंग्लंड संघाचा भारत दौरा आहे. त्याच्याआधीसुद्धा  भारतीय संघ सतत व्यस्त राहणार आहे.

त्यामुळे सतत सामने खेळत राहिल्यानंतर किमान ८ ते १० दिवसांची विश्रांती मिळावी अशी खेळाडूंची अपेक्षा असेलच. हे सर्व पाहता कोरोनाचा प्रभाव न राहिल्यास एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आयपीएल-2021 चे सामने होऊ शकतील अशी चिन्हे आहेत. कारण त्याआधी संघांसाठी लिलावही होतील आणि फ्रँचाईजी संघातील नव्या खेळाडूंना संघाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागणारच आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट मंडळ आयपीएल-2021 मध्ये दोन जादा संघ खेळवण्याच्या विचारात आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय मंडळाच्या २४ तारखेला होणाऱ्या वार्षिक सभेत होण्याची शक्यता आहे. या दोन संघांपैकी एक संघ अहमदाबादचा असेल हे जवळपास निश्चित मानले जाते तर दुसरा संघ कानपूर, लखनौ किंवा पुण्याचा असेल अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER