बटलरचा षटकार राजस्थानला का महागात पडला?

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) संध्याकाळच्या सामन्याच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) व के.एल.राहुलसारख्या (K.L Rahul) काही कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचे कारण आहे रात्री वातावरण थंड होत असताना पडत असलेले दव आणि त्यामुळे गोलंदाजांना चेंडूवर पकड राखण्यास येत असलेल्या अडचणी. यामुळे नंतर गोलंदाजी करणारे संघ अडचणीत येत असल्याची तक्रार आहे.

के.एल. राहुलने तर म्हटलेय की, रविवारच्या सामन्यात आपण दवाने ओलसर झालेला चेंडू बदलवण्याची मागणीसुद्धा पंचांकडे एक-दोन वेळा केली होती; पण ती फेटाळण्यात आली.  सामन्यात दोन्ही संघांना समान संधी द्यायची असेल तर दुसऱ्या डावात चेंडू बदलून मिळायलाच हवा, असे आग्रही मत त्याने मांडले आहे.

राहुलने परवाच ही मते मांडल्यावर काल सोमवारी चेन्नई (CSK) व राजस्थान दरम्यानच्या (RR) सामन्यात एक प्रसंग घडला जो चेन्नईच्या पथ्यावर पडला. रवींद्र  जडेजाच्या (Ravindra Jadeja) गोलंदाजीवर दहाव्या षटकात जोस बटलरने (Jos Butler) एक उत्तुंग षटकार लगावला. षटकार एवढा दणकेबाज होता की, चेंडू थेट गॅलरीत  गेला आणि मिळेनासा झाला. त्यामुळे पंचांना चेंडू बदलावाच लागला. एम.एस. धोनीच्या हातात तो चेंडू येताच तो जडेजाला म्हणाला की, आता चेंडू कोरडा आहे, हा नक्की वळेल. आणि खरोखर तसेच घडले. पुढच्या षटकात जडेजाच्या वळलेल्या एका चेंडूवर बटलर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर त्याने शिवम दुबेलाही पायचित पकडले. दुसऱ्या टोकाने मोईन अलीने नव्या चेंडूसह कहर केला. त्याने डेव्हिड मिलर, रियान पराग व ख्रिस मॉरिसला बाद केले. त्यामुळे राजस्थानचा डाव २ बाद ८७ वरून ७ बाद ९५ असा गडगडला आणि सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूने झुकला.

या सामन्यात ओलसर चेंडूच थोडा थोडा वळत होता. त्यामुळे कोरडा चेंडू तर वळणारच हे पक्के होते. हेच मी जडेजाला सांगितले, असे धोनी सामन्यानंतर म्हणाला.

ही बातमी पण वाचा : जाणून घ्या चेन्नईच्या 188 धावा का आहेत खास?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button