अर्शदीप म्हणतो, आयपीएलमध्ये घाबरुन चालत नसते!

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या चौथ्या सामन्यात ज्या दोन खेळाडूंनी लक्ष वेधले ते म्हणजे राॕयल्सचा शतकवीर कर्णधार संजू सॕमसन आणि पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीपसिंग (Arshdeep Singh). जिथे सॕमसनने 63 चेंडूत 119 धावांची खेळी करताना राॕयल्ससाठी अशक्यप्राय वाटणारा विजय जवळपास खेचून आणला होता तिथे अर्शदीपने संजू सॕमसनसह राॕयल्सचे तीन गडी 35 धावात बाद करुन पंजाबला किंग (Punjab Kings) ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. योगायोगाने सामन्यातील शेवटच्या काट्याच्या षटकात हेच दोघं आमनेसामने आले होते आणि त्यात सहा चेंडूत 13 धावा असे समीकरण असताना अर्शदीपने एका चेंडूत 5 धावा पर्यंत ते ताणले होते आणि अखेरच्या चेंडूवर सॕमसनला बाद करुन पंजाबचा 4 धावांनी विजय फळ्यावर लावला होता.

या शेवटच्या षटकाआधीही ख्रिस जाॕर्डन व अर्शदीप यांनी ठरलेल्या रणनितीनुसार गोलंदाजी करत सामना पंजाबच्या हातून निसटू दिला नव्हता. जाॕर्डन यार्कर टाकत चेंडू पून्हा पून्हा सीमापार होणार नाही याची काळजी घेत होता तर सिंग याला कोरड्या खेळपट्टीवर काहीसे संथ वा मंद चेंडू टाकत धावा रोखायच्या होत्या. त्यानुसार गोलंदाजी करत या दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नव्हे तर शेवटच्या चेंडूपर्यंत लांबवला होता.

अर्शदीप सिंग हा पहिल्यांदाच सामन्याचा निकाल ठरवणारे शेवटचे षटक टाकत होता. आपली सहा फूट तीन इंच उंची आणि सहा सामन्यांचा अनुभव त्याला उपयोगात आणायचा होता. आपली 19 पैकी 16 षटके त्याने अखेरच्या पाच षटकांत टाकली होती.

आयपीएलमध्ये तुम्ही घाबरुन चालत नसते. हा प्रकारच फलंदाजधर्जीणा आहे आणि यात तुम्हाला धावा रोखून धरत फलंदाजांना दबावात आणायचे असते. पॉवर प्ले,आणि डेथ,ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायचे संकट स्विकारायला मला आवडते. माझ्या संथ चेंडूंवर आणि याॕर्करवर माझा विश्वास आहे आणि शमी भाई यांनी मला स्वतःला विश्वास करायचे सांगितले आहे असे अर्शदीप म्हणतो.

अर्शदीप हा चंदीगडचा. तिथे तो जसवंत राय यांच्या प्रशिक्षणात घडला. त्याच्या गोलंदाजीतील विविधतेने राय यांना खूप प्रभावित केले. ते म्हणतात की त्याची उंची आणि त्याची धारदारता याने आपल्याला प्रभावित केले. षटकातील सहाच्या सहा चेंडू वेगवेगळ्या पध्दतीने टाकायचा तो विचार करायचा. त्याचा मारा सुरुवातीला काहीसा अनियंत्रित होता पण लवकरच त्याला त्याच्या अंडर सिक्स्टीनच्या प्रशिक्षकांनी अचूकतेचे महत्त्व पटवून दिले. दोन ते तीन तास एकाच टप्प्यावर आणि काहीसे आखूड चेंडू टाकायचा आम्ही सराव केला असे राय सांगतात. 2018 च्या सी. के. नायडू ट्रॉफी स्पर्धेत सहा सामन्यातच अर्शदीपने 27 विकेट काढल्या आणि तो चर्चेत आला. पण नंतर नोव्हेंबरात अंडर 19 चॕलेंजर ट्रॉफीच्या आरंभी त्याला दुखापत झाली आणि तो कमी वेगाने गोलंदाजी करायला लागला. त्यानंतर त्याने आपल्या मनगटाच्या हालचालींवर आणि धावत येण्याच्या पध्दतीत बदल केला. आयपीएलसाठी आवश्यक फिटनेस मिळवण्यासाठी त्याने सुरुवातीला कार आणि नंतर ट्रकचे टायर वापरुन सराव केला. त्यामुळेच आता तो आयपीएलमध्ये नव्या टायरसारखा धावताना दिसतोय अशी माहिती प्रशिक्षक राय यांनी दिली.

त्याने रोहीत शर्मा, मनीष पांडे व आंद्रे रसेलसारख्या फटकेबाजांना आपल्या जाळ्यात पकडले आहे. पाॕवर हिटर्सविरुध्द चेंडू थोडा वाईड टाकायचा, रोहितसारख्या फलंदाजांविरुध्द स्विंगचा उपयोग करायचा आणि संथ खेळपट्टीवर कटर्स मारायचे तंत्र त्याने अवलंबले. मोहम्मद शमी व इतर सीम गोलंदाजांचे तो मार्गदर्शन घेत गेला. कदाचित ते मला आता टाळायला लागले असतील एवढे प्रश्न मी त्यांना विचारले आहेत. शमीने सीम व गती कशी चांगली राखायची, शेल्डान काॕट्रेलने डावखुर्यांविरुध्द कशी गोलंदाजी करायची, ख्रीस जाॕर्डनने नियंत्रण कसे राखायचे हे शिकवल्याचे अर्शदीप सांगतो.

अर्शदीप हा इरफान पठाण व वसिम अक्रम यांचा चाहता असून त्यांना भेटायची त्याची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button