IPL 2020 : मोहम्मद सिराजने रचला इतिहास; आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

मोहम्मद सिराज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. शाहबाज अहमदच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) समावेश केला आणि त्याने कर्णधाराला निराश केले नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ वर्षांच्या  इतिहासात जे घडले नाही ते सिराजने केले आहे. पहिल्या तीन षटकांत त्याने दोन षटके फेकली. सिराज आयपीएलमधील सलग दोन षटके निर्धाव फेकणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत केवळ ८ धावा देऊन ३ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणूनही निवडले गेले.

सिराजने पहिल्याच षटकात सलग दोन चेंडूंत राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांच्या विकेट घेतल्या. पहिल्याच षटकात त्याने एकही धाव दिली नाही. यानंतर  दुसर्‍या षटकात  टॉम बैंटनला बाद करून तिसरी  विकेट घेतली. या षटकात एक धाव लेग बाय झाली. त्यामुळे हे षटकही निर्धाव षटकात मोजले गेले. तिसर्‍या षटकात त्याने दोन धावा दिल्या. तीन षटकांनंतर सिराजची गोलंदाजी ३-२-२-३ अशी झाली. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कधीही गोलंदाजाने एका सामन्यात सलग दोन षटके निर्धाव टाकले नव्हते. सिराजच्या शेवटच्या षटकात सहा धावा निघाल्या.

त्याच्या  शानदार गोलंदाजीनंतर केकेआरचा डाव कधीच सावरला नाही. केकेआरचा संघ निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून ८४ धावा करू शकला. प्रत्युत्तराच्या रूपात, आरसीबीने १३.३ षटकांत दोन गडी गमावून ८५ धावा केल्या आणि ८ गडी राखून विजय मिळविला. या विजयासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचला. आरसीबीच्या खात्यात १४ गुण आहेत तर केकेआर १० गुणांसह टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER