IPL: हा यंगिस्तानचा ‘त्रिकूट’ विजय, दुबई स्टेडियम मध्ये किंग खानने उपस्थित राहून भरला उत्साह

Kolkata Knight Riders.jpg

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या बुधवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) ३७ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सच्या विजयाची हॅटट्रिक अपूर्ण राहिली. कोलकाताच्या विजयात शुभमन गिलच्या (Shubman Gill) फलंदाजीनंतर युवा गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचे मोलाचे योगदान आहे.

केकेआरकडून युवा भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी यांनी आश्चर्यकारक गोलंदाजी केली. सामनावीर शिमव मावीने ४ षटकांत २० धावा देत २ गडी बाद केले तर नागरकोटीने २ षटकांत १३ धावा देऊन दोन बळी घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने एकाच षटकात या दोन्ही विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीनेही दोन विकेट्स आपल्या नावे केल्या.

प्रथम फलंदाजी करताना केकेआरने शुभमन गिलच्या ४७ धावा (३४ चेंडू) च्या मदतीने ६ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रॉयल्सचा संघ नऊ विकेट्सवर केवळ १३७ धावा करू शकला. गिल निरंतर दुसर्‍या अर्धशतकाकडे वाटचाल करत होता. पण आर्चरने त्याला १२ व्या षटकात बाद केले.

केकेआर (गिल-मावी-नागरकोटी) मधील हे तीन तरुण २०१८ च्या अंडर -१९ विश्वचषक विजेत्या भारतीय संघात होते आणि त्यांनी त्यांच्या कामगिरीमुळे आश्चर्यचकित केले. शुभमन गिलने पाच डावांमध्ये १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा केल्या होत्या, वेगवान गोलंदाजांची जोडी मावी आणि नागरकोटीने ९- ९ विकेट्स घेतल्या.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उपस्थित असलेला संघ मालक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या युवा वेगवान गोलंदाजांची जयजयकार करताना दिसला. १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्ससाठी कोणतीही मोठी भागीदारी होऊ दिली नाही.

दुसर्‍या षटकात आयपीएलचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू पॅट कमिन्स याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला (३)) बाद केले. पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनची विकेट घेऊन मावीने रॉयल्सला जोरदार झटका दिला. सलामीवीर जोस बटलर (२१) मावीचा दुसरा बळी ठरला.

रॉबिन उथप्पाचा खराब फॉर्म कायम राहिला, त्याने दोन धावा फटकावून नागरकोटीच्या चेंडूवर मावीला झेल दिले. त्याच वेळी, रियान पराग (१) सलग दुसर्‍या वेळी अपयशी ठरला, ज्याचा झेल गिलने नागरेकोटीच्या चेंडूवर घेतला.

पंजाबच्या विरोधात एका षटकात पाच षटकार ठोकणार्‍या राहुल तेवतियावर सर्वांचीच नजर होती आणि नागरेकोटीलाही त्याने षटकार ठोकला, पण १० चेंडूत १४ धावा फटकावून वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले . वरुणने जोफ्रा आर्चरला दुसरा बळी ठरविला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER