दिनेश कार्तिकला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले का?

Dinesh Karthik

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik). कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) कर्णधारपद सोडले. २०१८ मध्ये गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केकेआरचा तंबू सोडल्यापासून दिनेश कर्णधार होता; पण यंदा सात सामन्यांतले तीन पराभव आणि त्याचे फलंदाजीतील अपयश यामुळे त्याने स्वतःहूनच नेतृत्व सोडायचा निर्णय घेतला. ओईन मॉर्गनकडे (Eoin Morgan) आता केकेआरची धुरा आली आहे. दिनेशच्या या निर्णयानंतर लगेचच केकेआरला चॅम्पियन बनविणारा माजी कर्णधार गौतम गंभीरने एक ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटलेय की, कोणताही वारसा निर्माण करण्यासाठी किती तरी वर्षे लागतात; पण तो नष्ट व्हायला काही मिनिटेसुद्धा पुरेसे ठरतात.

या ट्विटवरून हे तर स्पष्टच आहे की, नाईट रायडर्समध्ये जे काही चाललंय त्यावर गौतम फार काही समाधानी नाही. आपले हे ट्विट कशासंदर्भात आहे हे त्याने स्पष्ट केलेले नाही; पण या ट्विटची वेळ न बोलताच बरेच काही सांगून जाणारी आहे. नंतर या नेतृत्वबदलाबद्दल मात्र त्याने आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. तो म्हणतो की, नेतृत्व ओइन मॉर्गनकडे सोपवल्याने फार काही फरक पडेल असे नाही. उलट कार्तिकवर एवढे दडपण कशासाठी आणले गेले, असा सवाल त्याने केला आहे. केकेआरचा संघ यंदा निम्मे सामने आधीच खेळलेला असल्याने आता ह्या बदलाने काय साध्य होईल, असे तो म्हणतो. क्रिकेट संबंध जोपासण्यासाठी नसते तर कामगिरी करून दाखवायचा खेळ आहे. खरं सांगायचं तर मॉर्गन फार काही बदल करून दाखवेल असे वाटत नाही. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याला धुरा सोपवली असती तर काही झाले असते.

मात्र चालू स्पर्धेदरम्यान कुणीच फार काही बदल घडवू शकत नाही. कर्णधार व प्रशिक्षकाचे नाते चांगले असणे ही चांगली गोष्ट आहे; पण आता काही चमत्कार होणार नाही असे तो मॉर्गन व ब्रेंडन मॕक्क्युलम यांना उद्देशून म्हणाला. कार्तिक अडीच वर्षापासून संघ सांभाळतोय त्यामुळे या निर्णयाचे आश्चर्य वाटले. आणि केकेआरची स्थिती एवढीही खराब नव्हती की त्यांना कर्णधार बदलण्याची गरज पडावी. विश्वचषक विजेता कर्णधार संघात असल्याने कार्तिकवर दडपण होते. असे असेल तर सुरुवातीपासूनच मॉर्गनला कर्णधारपद द्यायला हवे होते.

कार्तिकला त्या दडपणात ठेवायचे कारण काय, असे गंभीरने म्हटले आहे. तो पुढे म्हणतो की, मी चांगली कामगिरी करण्याकडे, फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करू इच्छितो, असे कुणी म्हणते तर ते ऐकायला बरे वाटते; परंतु संघव्यवस्थापनाकडून जेव्हा तुम्हाला संदेश येऊ लागतात की, ते फार समाधानी आहेत की नाहीत तर ती फार दुर्दैवाची बाब असते. गंभीरने हे विधान करून सूचित केले आहे की, दिनेश कार्तिक स्वतःहून कर्णधारपद सोडल्याचे सांगत असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. २०१८ मध्ये आपण कर्णधारपद सोडले तेव्हाची स्थिती वेगळी होती. मी दिल्लीचे फक्त सातच सामन्यांत नेतृत्व केले होते; पण कार्तिक अडीच वर्षांपासून करतोय. त्यामुळे संघव्यवस्थापनाला त्याची कामाची पद्धत चांगल्या प्रकारे ठाऊक होती. मी दिल्लीकडे अगदी वेगळ्या मन:स्थितीत गेलो होतो. मला दिल्ली संघाचे नशीब पालटायचे होते; पण सात सामन्यांत काहीच घडले नाही तेव्हा मी कर्णधारपद सोडणेच योग्य समजले होते.

आयपीएलमधील नेतृत्वबदल

 • 2008- लक्ष्मण/ गिलख्रिस्ट
  (डेक्कन चार्जर्स)- सातवा सामना
 • 2009- पीटरसन/ कुंबळे
  (राॕयल चॕलेंजर्स )- सातवा सामना
 • 2012- व्हेट्टोरी/ कोहली
  (राॕयल चॕलेंजर्स) – आठवा सामना
 • 2012- संगकारा/ व्हाईट
  (डेक्कन चार्जर्स)- आठवा सामना
 • 2013- धवन/ सॕमी
  (सनरायजर्स हैदराबाद)- 11 वा सामना
 • 2016- मिलर/ विजय
  (किंग्ज इलेव्हन पंजाब)-सातवा सामना
 • 2018- गंभीर/ अय्यर
  (दिल्ली कॕपिटल्स)- सातवा सामना
 • 2019- रहाणे/ स्टिव्ह स्मिथ
  (राजस्थान राॕयल्स)- सातवा सामना
 • 2020- कार्तिक/ माॕर्गन
  (कोलकाता नाईट रायडर्स)- आठवा सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER