आयओसीचे ठरले, टोकियो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणेच होणार; परिस्थिती कशीही असू दे!

टोकियोमधील परिस्थिती कोरोनामुळे अगदी आणिबाणीची जरी असली तरी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) सामने ठरल्याप्रमाणेच होतील असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे जपानी जनतेमधून या सामन्यांच्या आयोजनाला वाढता विरोध असल्याचे दिसून येत आहे. एका जागतिक वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 70 टक्के प्रतिसाद हा ऑलिम्पिक सामने रद्द करावेत किंवा पुढे ढकलावेत असा आहे. कोरोना (Corona) साथीच्या भितीने जपानमधील किमान 50 नियोजित सराव शिबिरे आधीच रद्द करण्यात आले आहेत.

टोकियो ऑलिम्पिक सामन्यांना आता फक्त नऊ आठवड्यांचा अवधी आहे. मात्र कोरोनाच्या साथीमुळे जपानमधील (Japan) वैद्यकीय यंत्रणेवर आधीच ताण असताना ऑलिम्पिकमुळे आणखीनच ताण वाढेल अशी जपानी जनतेला भीती आहे. ती भीती कमी करण्यासाठी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी आयओसीची नुकतीच तीन दिवस ऑनलाईन मिटींग झाली.

टोकियो ऑलिम्पिक सामने गेल्यावर्षी जुलैमध्येच होणार होते पण कोरोनाच्या साथीमुळे ते वर्षभर पुढे ढकलण्यात आले मात्र अलीकडेच टोकियो आयोजकांचा उत्साह वाढविणारी एक बातमी आली आहे. त्यानुसार 2024 च्या आॕलिम्पिकचे यजमान असलेल्या फ्रान्सचे अध्यक्ष एमॕन्युएल मेक्राॕन हे टोकियोच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

आयओसीचे उपाध्यक्ष जाॕन कोटस् यांच्या म्हणण्यानुसार टोकियोमध्ये स्थिती आणिबाणीची असली तरी सामने हे होतीलच. अतिशय वाईट परिस्थितीचा विचार करून खेळाडू व जपानी नागरिकांची सुरक्षा आणि त्यांची काळजी घेण्याची आमची योजना तयार आहे. 23 जुलैला ऑलिम्पिक सामने सुरू होतील मात्र त्याआधीच ऑलिम्पिक नगरीतील 80 टक्केहून अधिक रहिवाशांचे लसीकरण झालेले असेल. सामन्यांच्या ठिकाणी कोविड-19 च्या संभाव्य संकंटांचा सामना करण्यासाठी परदेशी ऑलिम्पिक प्रतिनिधी मंडळातील वैद्यकीय पथके उपलब्ध असतील.

एका वृत्तानुसार सद्यस्थितीत जपानमध्ये केवळ 4.1 टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे आणि हे प्रमाण विकसीत देशांमध्ये सर्वात कमी आहे. त्यांच्या वैद्यकिय चमूंपैकी निम्म्याच जणांचे लसीकरण झाले आहे. जपानमध्ये अजुनही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध कायम आहेत. अधिकाधिक लोकांचे लसीकरण होईल तसतसा लोकांचा ऑलिम्पिकला विरोध मावळेल अशी कोटस् यांना आशा आहे. पण तसे झाले नाही तरी आम्ही आमचे काम करत राहणार आहोत. सर्व सहभागी खेळाडूंसाठी आणि जपानी लोकांसाठी सामने सुरक्षितरित्या आयोजित होतील हे सुनिश्चित करणे हे आमचे काम असेल असे कोटस् यांनी म्हटले आहे.

जाॕन कोटस् यांनी म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर वैज्ञानिक व वैद्यकीय संघटनांनी आम्ही केलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले आहे.

आयोजन समितीचे प्रतिनिधी सिको हाशिमोटो यांनी दिलेल्या माहितीनुसार संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या परदेशी पथकातील सदस्यांची संख्या एक लाख 80 हजारावरुन 78 हजार प्रतिनिधींपर्यंत कमी करण्यात आली आहे. यात ऑलिम्पिकचे 11 हजार आणि पॕरालिम्पिकचे 4400 खेळाडू असतील. सिको यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिकवेळी दिवसाला 230 डॉक्टर आणि 300 नर्सेस तैनात असतील. दररोज 50 ते 60 हजार कोरोना चाचण्या करण्यात येतील आणि यासाठी लागणारे 80 टक्के मनुष्यबळ निश्चित करण्यात आले,आहे आणि याचा ताण स्थानिक वैद्यकीय सेवांवर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

असे असले तरी संसर्गाच्या भितीने जपानमधील,जवळपास 50 सराव शिबिरे रद्द करण्यात आली आहेत आणि कॕनेडीयन जलतरण चमूने आॕलिम्पिक पूर्व सराव शिबिरात सहभागी होण्यास नकार दिला आहे.अमेरिकेच्या अॕथलेटिक्स चमूनेही चिबा या शहरातील आपले शिबीर गेल्याच आठवड्यात रद्द केले आहे.

दरम्यान, आणखी एका सर्वेक्षणानुसार जपानमधील 37 टक्के प्रतिष्ठानांनी (firms) ऑलिम्पिक रद्द करावे आणि 32 टक्के प्रतिष्ठानांनी ऑलिम्पिक पुन्हा एकदा पुढे ढकलावे असा अभिप्राय नोंदवला आहे. याचा अर्थ 69 टक्के जपानी प्रतिष्ठानांना सध्या ऑलिम्पिक सामने होणे नको आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button