ऑलिम्पिक संघटनेला चूक उमगली; भारताच्या ऑलिम्पिकपटूंचा पोशाख आता चिनी नसणार !

Indian Olympic Association

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) जवळ आलंय आणि नेहमीप्रमाणे या ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय पथकाबाबतचे (India) वादविवाद सुरू झाले आहेत. टोकियोला जाणाऱ्या भारतीय पथकासाठीचा जो पोशाख आहे तो अशाच विवाद आणि गोंधळामुळे आता अनब्रँडेड असणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (Indian Olympic Association- IOA) काहीशा उशिरानेच जाणवले की, भारतीय संघासाठी आपण जो पोशाख निवडलाय तो भारताचा हितचिंतक (?) असलेल्या चीनमधील कंपनीचा आहे. विशेष म्हणजे चिनी ब्रँडच्या या पोशाखाचे क्रीडामंत्री किरैन रिजिजू (Kirain Rijiju) यांच्या निवासस्थानी मंत्र्याच्या हस्ते अनावरणसुद्धा झाले होते; पण त्यावेळी बहुधा आयओएला तो पोशाख चिनी ब्रँडचा असल्याची जाणीव झाली नव्हती.

मात्र आता ही जाणीव झाल्यानंतर चिनी कंपनी लि निंगचा (Li Ning) तो पोशाख नाकारण्यात आला आहे आणि त्यामुळे टोकियोत भारतीय पथक बिना ब्रँडच्या पोशाखात दिसणार आहे. टोकियो ऑलिम्पिक सामने २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. चिनी ब्रँडेड कंपनीच्या पोशाखात खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी टीका होत होती. त्यामुळे ही नाराजी दूर करणारा निर्णय जाहीर करताना आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांनी म्हटले आहे की, देशवासीयांच्या भावनांची आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही पोशाखांसाठीचा हा करार रद्द करत आहोत. आमच्या खेळाडूंकडे कुणी बोट दाखवावे आणि त्यांना कुणी अडचणीचे प्रश्न विचारावेत असे होऊ नये. आधीच गेल्या दीड वर्षांपासून ते कोरोनामुळे त्रस्त आहेत आणि आता त्यांना आणखी विचलित करणाऱ्या गोष्टी आम्हाला नको आहेत. आपले खेळाडू व प्रशिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीची आपल्याला कल्पना आहे आणि त्यांची कामगिरी चांगली होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचेही आयओएच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दोन ध्वजवाहक असतील ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये स्त्री-पुरुष समानता असावी म्हणून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचे एक पुरुष व एक महिला असे दोन ध्वजवाहक असतील अशी शक्यता नरेंदर बत्रा यांनी बोलून दाखवली आहे. त्यांची नावे लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. सध्या यावर सल्लामसलत सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हा २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक होता. पथक असेल १९० जणांचे या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथक १९० सदस्यांचे असण्याची शक्यता आहे.आतापर्यंत भारताचे ५६ पुरुष व ४४ महिला असे बरोबर १०० खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले आहेत. आणखी २५ ते ३० खेळाडू पात्र ठरतील असा अंदाज आहे. बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, नौकानयन, अथलेटिक्स, धनुर्विद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी, रोइंग, नेमबाजी आणि टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडू पात्र ठरले आहेत.

क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार खेळाडू संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक अधिकारी व इतर पथकात असू शकत नाहीत. मात्र त्यापेक्षा अधिक अधिकारी सरकारी खर्चाने पाठविता येऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button