
सातारा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज तथा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ त्यांचे आभार मानले. याप्रसंगी खासदार उदयनराजे यांना सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण दिले. आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन योगी यांनी दिले.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी केली.सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सिम भक्त असून त्यांच्या स्वराजातून आजही आम्हाला मोठी प्रेरणा मिळते. त्यांच्यासारख्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे. महाराजांचा गनिमी कावा साऱ्या जगाने गौरविलेला आहे. आजही अनेक देशात या तंत्रांचा वापर केला जातो. ही अभिमानाची बाब असल्याचे योगी यांनी सांगितले.
खा. उदयनराजे म्हणाले, अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यानींसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. मात्र तुमच्या सारख्या राजकीय नेत्यांने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास संपूर्ण जगापुढे आणण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले. त्याच शिवसेनेला महाराजांच्या किर्तीला साजेसं असे स्मारक उभारता आलेलं नाही. मात्र उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे खासदार उदयनराजे यांनी सांगितले. यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने देण्याचे उदयनराजे यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला