वनस्पती परीचय – खदिर

Khadir

दंतमंजनामधे खदिराचे नाव आपण बरेचवेळा ऐकले असेल, विड्याच्या पानाला लावणारा कत्था असो वा दंतमंजनाचे घटक द्रव्य, खदिर वृक्ष जरी परीचयाचा नसला तरी या वृक्षाचा उपयोग आपण करीत असतो. खदिर कुष्ठहर औषध म्हणून खूप उपयोगी आहे. रक्तसार( याचा सार रक्तवर्णी असतो) दंतधावन ( दात स्वच्छ करणारा) बालपत्र ( लहान लहान पाने असतात) यज्ञिय ( यज्ञात काड्यांचा उपयोग करतात) अशी पर्यायी नावे खदिराला आली आहेत. गाणाऱ्या माणसाच्या घशाला खदिराच्या पाण्याने गुळण्या केल्याने बल मिळते म्हणून याला गायत्री असे सुद्धा म्हणतात.

खदिर वृक्षाचा निर्यास स्वरूप कात पाझरतो. खैराच्या (खदिर) सालीचा काढा गाळून आटवून सुद्धा कात तयार करतात. खदिर कडू व तुरट रसाचा असतो. खदिर, त्वचा विकारांवर प्रभावी काम करणारी वनस्पती आहे. रक्त स्तंभन करण्यात खूप उपयोगी आहे. त्यामुळे त्वचेतून रक्तस्राव होत असल्यास रक्तस्राव बंद करण्यास खदिरचूर्ण वापरता येते. दंतमंजन मधे खदिराचा उपयोग केल्याने दंतरोग होत नाही तसेच हिरड्यांना बळकटी मिळते. पूय व रक्त येणे थांबते.

व्रण जखम झाली असल्यास पूय नष्ट करण्याकरीता जखम लवकर भरुन येण्याकरीता खदिर फायदेशीर आहे. आगीने भाजल्या गेले असेल किंवा गरम चटका लागल्याने जखम झाली असेल तर खदिराचा लेप लावावा. घश्याच्या रोगांमधे खदिरसार उत्तम औषध आहे. कफयुक्त कास आवाज बसणे घसा खवखवणे यात खैराचा काढा मधासह गुळण्या केल्याने आराम पडतो. त्वचा विकारात कुष्ठ रोगात खदिराच्या काढ्याने स्नान करावे. त्याचा लेप सुद्धा लावावा. तोंडास फोड येणे, मुखपाक मुखरोग छाले याकर खदिराचा काढा मधासह तोंडात धारण करावा. यामुळे जिव्हा दंत ओष्ठरोग बरे होतात. रक्ताची वृद्धी करणारे रक्त शुद्ध करणारे असल्याने पांडु रोगात उपयोगी आहे. खदिरादि गुटी, खदिरासव, खदिरादि काढा असे विविध औषधी कल्प खदिरापासून बनविले जातात. जे विविध व्याधींमधे लक्षणानुसार वापरले जातात.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER