शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात भाजपाप्रवेशाच्या बातम्यांवरून ‘इंटरनेटवॉर’

Shivajirao Adhalrao Patil - Amol Kolhe

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. या संदर्भात आढळराव पाटील यांनी फेसबुवकर पोस्ट लिहून खुलासा केला आहे. त्यात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीआधी परस्परांचे शत्रू असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सोबत आल्याने सत्तेच्या परिघात नेत्यांनी जमवून घेतले; पण अनेक मतदारसंघांत या पक्षांच्या स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे. शिरूर मतदारसंघात अशीच स्थिती आहे.

अमोल कोल्हे यांच्याही भाजपाप्रवेशाबाबत वृत्तपत्रातील बातमीचा फोटो व्हायरल करून त्यांच्यावर टीका होते आहे. राष्ट्रवादीतील चार आमदारांनी अमोल कोल्हे यांना हैराण केल्याने ते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे या बातमीत म्हटले आहे. शिरूर मतदारसंघातील या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल भाजपाप्रवेशाची बातमी शेअर करत असल्याने मतदारसंघात चांगलाच गोंधळ उडाला आहे.

मूळ प्रकरण असे की, लोकसभेच्या निवडणुकीत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करत ‘जायंट किल’र ठरले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत राज्यात सत्तास्थापन केली. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांचे गणित बदलले आहे. याच कारणामुळे आढळराव पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची एक बातमी मतदारसंघात व्हायरल केली जाते आहे. ही बातमी खोडून काढत आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.

‘ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाही अन् त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा! करमणूक अन् कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासाने लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसे होणार नाही. माझ्याविषयी खोटी माहिती पसरवून शिरूर लोकसभेतील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही.’ अशी फेसबुक पोस्ट लिहून आढळराव यांनी त्यांच्या भाजपाच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात व्हायरल होत असलेल्या बातमीत, शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर टीका केली नाही, असे म्हटले आहे. आढळराव यांनी स्वत: एक ब्लॉग लिहून कंगनावर टीका केली आहे. हा ब्लॉग त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केला आहे.

“कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना!” या शीर्षकाखाली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आढळराव पाटील यांनी कंगनाच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अफवांना अमोल कोल्हे यांचे उत्तर
अमोल कोल्हे यांच्याबाबतची बातमी व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांनीही ट्विट करत उत्तर दिले. १५ वर्षे मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पाहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार, असा टोमणा अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER