काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका आघाडी सरकारला बसणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut-Mahavikas Aghadi

मुंबई : काँग्रेस (Congress) पक्ष हा देशातील सर्वांत जुना पक्ष आहे. मात्र, काँग्रेसचे वैभव आता राहिलेले नाही. काँग्रेसने तरुण पिढीकडे नेतृत्व दिले पाहिजे. पक्ष अंतर्गत वादामुळे जर्जर झाला आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बसणार नाही. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकार पडण्याचे स्वप्न बघू नये, असे परखड मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या ‘सामना’तून काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर रोखठोक भूमिका मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- मुखवटा बदलून जनाधार लुटणारी राष्ट्रवादी हे काँग्रेसचेच अपत्य – संजय राऊत

यावेळी राऊत म्हणाले की, कॉंग्रेस हा देशातील सर्वांत  जुना पक्ष आहे. मात्र अंतर्गत वादामुळे तो जर्जर झाला आहे, याचं मला दुःख आहे. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरून वादळ निर्माण झाले ते अद्यापही शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे. काँग्रेसच्या ज्या नाराज असलेल्या २३ नेत्यांनी पत्र पाठवले, ते मत काही चुकीचे नव्हते. पक्षाला एका चांगल्या सक्रिय नेतृत्वाची गरज आहे. मात्र गांधी परिवाराशिवाय कॉंग्रेसला दुसरा कुठलाही पर्याय नाही, ही जनभावना आहे. एक मोठा पक्ष राजकारणापासून दूर चालला आहे, हे संसदीय लोकशाहीसाठी हितकारक नाही, असेही राऊत म्हणाले. आमच्या महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही, आमच्या पक्षात कोणी पत्र लिहिले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपासारखा प्रबळ विरोधी पक्ष आहे.

महाराष्ट्रातील सरकारला कॉंग्रेसच्या या वादाचा फटका बसणार नाही. त्यामुळे सरकार पडण्याचे स्वप्न विरोधकांनी बघू नये, अशी खोचक टीका त्यांनी विरोधकांवर केली. यावेळी त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतही भाष्य केलं. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदव्या वाटा ही आमची भूमिका कधीच नव्हती. परीक्षांच्या तारखा बदला, आमचेही हेच म्हणणे होते. न्यायालयाने ठोस निर्णय दिलेला नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात न्यायालयाने मुंबई पोलिसांवर ताशेरे कुठेच ओढले नाहीत; मात्र तपास सीबीआयकडे दिला. परीक्षेबाबतही न्यायालयाची भूमिका तशीच होती, असे संजय राऊत म्हणाले. सध्या राज्यभरातील मंदिरे बंद आहेत. मंदिरावर अनेक कुटुंबांचा गाडा चालतो. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे.

मात्र लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वत्र कोरोनाचा प्रसार झालेला दिसला. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की, कोरोना ही देवाची करणी आहे- अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला. मंदिराचेही अर्थकारण आहे. त्याच्या भरवशावर अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. पुजारी आहेत, मंदिराबाहेर हार- फुले, प्रसादाची दुकाने असतात. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. भाजपच्या घंटानाद आंदोलनाआधीच आमच्यापर्यंत व्यथा पोहचली. लोकांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतले असतील तर भाजपने सरकारशी चर्चा करावी. मंदिर हे उदरनिर्वाहाचेच साधन आहे, भूतलावरचे प्रत्येक क्षेत्र उदरनिर्वाहाचे साधन आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER