गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद? हायकमांडला रात्रीच अहवाल देणार

मुंबई : परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या लेटर बॉम्बनंतर विरोधी पक्ष भाजपने (BJP) गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यावरुन राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसचीही नाहक बदनामी होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींबाबत काँग्रेस (Congress) हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. त्यांनी आजच राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अहवाल मागवला आहे.

हायकमांडच्या आदेशानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे अटक, परमबीर सिंग यांची उचलबांगडी ते त्यांनी टाकलेला लेटर बॉम्ब यावरुन काँग्रेसच्या होत असलेल्या बदनामीवर चर्चा केली जात आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र देशमुखांना क्लीन चिट दिलीय. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट आणि मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

गृहमंत्र्यांवर होत असलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारा असल्याचा एका गटाचा सूर आहे. त्यामुळे देशमुखांचा राजीनामा नको, अशी भूमिका या गटाने मांडल्याचं ऐकण्यात येत आहेत. तर दुसरीकडे चौकशी होईपर्यंत देशमुखांनी पदमुक्त होणे महाविकास आघाडीच्या हिताचं असल्याचा सूर दुसऱ्या गटाचा आहे. भाजपकडून होत होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यात मागे पडत आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोपनीय माहिती पुरवणारे शुक्राचार्य कोण याचा आधी मुख्यमंत्र्यांनी शोध घ्यावा, असा सर्व नेत्यांचा सूर निघाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या काही दिवसात विविध प्रकरणावरुन भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडत असल्याची भावना काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. फडणवीसांचे बेछूट, राजकीय आरोप खोटे असले तरीही राष्ट्रवादीचे मंत्री बोलत का नाहीत? जर भाजप अश्याप्रकारे आरोप करत राहिली आणि आघाडी सरकार त्याचे उत्तर देण्यास असमर्थ ठरली तर ते आघाडी सरकारसाठी घातक ठरेल, असा सूर या बैठकीत उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीनंतर आज रात्रीच सविस्तर अहवाल हायकमांडला पाठवला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER