जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनरवरुन नाथाभाऊ गायब, राष्ट्रवादीत धुसफूस

Eknath khadse-Jayant Patil

जळगाव : भाजपला (BJP) रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सहभागी झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गुरुवारी पहिल्यांदाच पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते. मात्र, यापैकी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंना आपले म्हणून स्वीकारले का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर सोपविली आहे. अशावेळी स्वागताच्या फलकावर त्यांचाच फोटो न गायब झाल्याने मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज जयंत पाटील जळगावात आल्यानंतर नक्की काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर्स उतरवले…

दरम्यान, पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल 107 बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER