मुंबई ‘आयआयटी’मधील चुकीने गमावलेला प्रवेश पुन्हा मिळाला विद्यार्थ्यास सुप्रीम कोर्टाचा अंतरिम दिलासा

iit Bombay & sc

नवी दिल्ली : मुंबई ‘आयआयटी’मध्ये गुणवत्तेवर मिळालेला प्रवेश, गैरसमजामुळे घडलेल्या चुकीमुळे गमावावा लागलेल्या आग्रा येथील १८ वर्षाच्या विद्यार्थ्यास सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्याने केलेल्या अपिलावर जानेवारीत सुनावणी होऊन निकाल होईपर्यंत मुंबई ‘आयआयटी’ने त्याला हंगामी प्रवेश देऊन वर्गांत बसू द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सिद्धांत बात्रा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आई-वडील लहानपणीच वारल्यानंतर आजी-आजोबांनी लहानाचे मोठे केलेल्या सिद्धांतने ‘जेईई’ परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर  २७० असा गुणवत्ताक्रमांक पटकाविला होता.

देशातील सर्व ‘आयआयटीं’मधील  ऑनलाइन प्रवेशाची पहिली फेरी गेल्या ऑक्टोबरमध्ये झाली. त्यात सिद्धांतला मुंबई ‘आयआयटी’त गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. काही नवी महिती आहे का हे पाहण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी सिद्धांत ‘आयआयटी’च्या पोर्टलवर सर्फ करत असताना त्याला त्यात ‘फ्रीझ’ अशी एक लिंक दिसली. त्यावर क्लिक केले असता ‘तुम्हाला प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडायचे आहे का?’, असे विचारले गेले. त्यावेळेच प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेºया सुरु होत्या. सिद्धांतला वाटले की, ज्यांना आधीच प्रवेश मिळालेला आहे त्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ही लिंक असावी. त्याला प्रवेश मिळालेला होता. त्यामुळे त्याने त्या लिंकवर क्लिक केले. नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रवेश यादी प्रसिद्ध झाली तेव्हा सिद्धांतला धक्काच बसला. कारण  त्या यादीतूत त्याचे नाव गायब होते. त्याने चुकीचा समज करून घेऊन ज्या लिंकवर क्लिक केले होते त्याचा अर्थ त्याने मिळालेला प्रवेश सोडून दिला असा घेतला गेला होता!

सिद्धांतने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. सर्व जागा भरलेल्या असल्याने आता काहीच केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका मुंबई ‘आयआयटी’ने घेतली. तरी सिद्धांतने केलेली याचिका हाच त्याचा विनंती अर्ज आहे असे मानून त्यावर ‘आयआयटी’ने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले. परंतु अखेरीस ‘आयआयटी’ने त्याला नकार कळविला.

सिद्धांतने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. ते न्या. संजय कृष्ण कौल, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठापुढे आले तेव्हा ‘आयआयटी’ने पुन्हा नकारघंटा वाजवून आता सिद्धांतला प्रवेश देणे कसे शक्य नाही हे सांगत नियमांचा पाढा वाचला. सिद्धांतच्या वकिलाने, सिद्धांतने त्या लिंकवर क्लिक करणे ही गैरसमजातून घडलेली चूक कशी होती, हे सांगितले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश देऊन सिद्धांतला मोठा दिलासा दिला. त्याचे ‘आयआयटी’मधील शिक्षण पुढे सुरु राहील की नाही हे जानेवारीतील सुनावणीनंतर ठरेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER