परभणीच्या सात ‘सीएए’ निदर्शकांचा अंतरिम अटकपूर्व जामीन कायम

aurangabad high court

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेला सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व ‘राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर’ (NRC) यांच्या विरोधात गेल्या २० डिसेंबर रोजी परभणी शहरात आयोजित केलेल्या निदर्शनांच्या वेळी दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करणे आणि दोन पोलिसांना जखमी करण्याचा आरोप असलेल्या सात निदर्शकांना यापूर्वी दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केला. या निदर्शनांचे आयोजन ‘कुल जमाते विफाक मिल्ली मुत्तेहिदा महज मुस्लिम ऑर्गनायजेशन’ने केले होते.

परभणीतील इदगाह मैदानापासून निघालेला हा मोर्चा शिवाजी पुतळ्यापाशी आल्यावर मोर्चेकर्‍यांनी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली होती. एक तर या मोर्चा व निदर्शनांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. शिवाय मोर्चेकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही दुकानांचे व वाहनांचे  नुकसान झाले व दोन पोलीस शिपाई जखमी झाले, असे पोलिसांचे म्हणणे होते. परभणीच्या न्यू मोंढा पोलीस ठाण्याने या संदर्भात ज्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता त्यांच्यापैकी आठ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले. उच्च न्यायालयाने याआधी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्या. एम. जी. सेवलीकर यांनी तो कायम केला.

न्यायालयाने म्हटले की, पोलिसांच्या तपासाची कागदपत्रे पाहता या निदर्शनासाठी पूर्वपरवानगी घेतली नव्हती असे दिसते. परंतु दगडफेकीत मालमत्तेचे नुकसान व पोलीस जखमी झाल्याचा ‘स्पॉट पंचनामा’ केलेला नसल्याने ही बाब प्रथमदर्शनी तरी सिद्ध होत नाही. अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करताना घातलेल्या अटीनुसार याचिका करणारे नियमितपणे पोलिसांकडे हजेरी लावत असल्याचेही दिसते; शिवाय त्यांना अटकेत घेऊन तपास करण्याची गरज आहे, असेही दिसत नाही. ज्यांचा अटकपूर्व जामीन कायम करण्यात आला त्यांत सैयद मोईनुद्दीन, खमिसा गुलाम मोहम्मद, सालेह अब्दुल राब, महम्मद फारुख काद्री, मोहम्मद सिद्दिक खान, अब्दुल वाजेद अन्सारीव मोहम्मद फैजान मुजाहिद काद्री यांचा समावेश आहे.

यापैकी खमिसा गुलाम मोहम्मद आंदोलनाचे आयोजन करणार्‍या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. याखेरीज व्यवसायाने वकील असलेल्या सैयद वाजेद कादर यांच्यावरही गुन्हा नोंदला गेला होता व त्यांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. परंतु तो कायम केला जाण्याआधीच त्यांचे निधन झाले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER