महावितरणच्या आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धा शुक्रवारपासून अमरावतीत

नागपूर/अमरावती : महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धा अमरावती येथील ‘संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह, येथे २० व २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार २० सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल राहतील, तर प्रमुख उपस्थिती संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण राहणार आहे. याप्रसंगी मुख्य अभियंता (गुणवत्ता व नियंत्रण नागपुर) सुहास रंगारी, गोंदीया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिष गजबे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

ही बातमी पण वाचा : नाटकातील संवादात बदल केल्यास मान्यता रद्द होणार

स्पर्धेत शुक्रवार सकाळी ९ वाजता नागपूर परिमंडळातर्फ़े आनंद नाडकर्णी लिखित ‘त्या तीघांची गोष्ट’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे, यानंतर दुपारी २ वाजता गोंदीया परिमंडळातर्फ़े सलीम शेख लिखित ‘फ़तवा’ तर सायंकाळी ६ वाजता अकोला परिमंडळातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘जननी जन्म भूमिच’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता चंद्रपूर परिमंडळातर्फ़े प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानीमनी’ तर दुपारी २ वाजता अमरावती परिमंडलातर्फ़े हेमंत एदलाबादकर लिखित ‘एका ब्लॉकची गोष्ट’ हा नाट्यप्रयोग सादर होईल.

दोन दिवस चालणाऱ्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण शनिवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांच्या अध्यक्षतेत आणि कार्यकारी संचालक (प्रकल्प) चंद्रशेखर येरमे, कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (वितरण) अरविंद भादीकर आणि नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. असे नाट्यस्पर्धेच्या स्वागताध्यक्षा तथा अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी माहिती दिली.