वीज बिल सोमवारपर्यंत माफ झाले नाहीत तर तीव्र आंदोलन; मनसेचा इशारा

Bala Nandgaonkar

मुंबई :कोरोना (Corona) काळात आलेली वाढीव वीज बिले सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसे राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जातो आहे.

ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. या सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील, नागरिकांनी घाबरू नये. वाढीव वीज बिल भरू नयेत, असे आवाहन नांदगावकर यांनी केले.

शरद पवारांच्या शब्दाला किंमत नाही

वाढीव वीज बिले माफ करण्याबाबत राज ठाकरे स्वतः शरद पवार यांना भेटले होते. त्यांना निवेदन देण्यास सांगण्यात आले. विविध कंपन्यांची निवेदने पवारांकडे पाठवण्यात आली. मात्र, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. शरद पवारांवर आमचा विश्वास आहे; पण आता त्यांनाही सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही, असे आम्हाला वाटते.

जनतेचा उद्रेक झाल्यास जबाबदारी सरकारची

राज्य शासनाने श्रेयवादाची लढाई न करता लोकांची वीज बिले माफ करून टाकावीत. सोमवारपर्यंत यावर निर्णय झाला नाही तर राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चे नेईल. राज्यभर मनसे स्टाईल उग्र आंदोलने केली जातील. जनतेच्या रागाचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही नादंगावकर यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER