विम्याचे हप्ते शिक्षकानी स्वत: भरावेत- रत्नागिरी पंचायत समितीचा ठराव

रत्नागिरी/प्रतिनिधी : शिक्षकांचे वेतन काढताना विम्याचे हप्ते कापण्याचे वेळखाऊ काम वाढत असल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांनी आपले विम्याचे हप्ते स्वत: भरावेत, असा निर्णय शुक्रवारी झालेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला.

शिक्षण सभापती प्राजक्ता पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर आज पहिलीच सभा झाली. यावेळी गटविकास अधिकारी टी.बी. जाधव, उपसभापती दत्तात्रय मयेकर, सदस्या विभांजली पाटील, संजना माने, साक्षी रावणंग, प्राजक्ता पाटील, प्रेरणा पांचाल, आकांक्षा दळवी, रिहाना साखरकर, सदस्य अभय खेडेकर, उत्तम सावंत, शंकर सोनवडकर, ऋषिकेश भोंगले उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांच्या वेतनाचा मुद्यावर जोरदार चर्चा झाली. शिक्षकांना वेतन वेळेवर का मिळत नाही, याची कारणे समोर आली. शिक्षकांचे वेतन काढताना त्यांच्या विम्याचे हप्ते तसेच इतरही रक्कम वेतनातून कपात करुन ते वेतन देण्यात येते. मात्र, विम्याचे हप्ते कापण्याच्या कामासाठी जास्त वेळ लागत असल्याने शिक्षकांचे वेतन उशिरा होते. त्यामुळे यापुढे विम्याचे हप्ते शिक्षकांनी स्वत:च भरावेत. विम्याच्या हप्त्याची वेतनातून कपात करण्यात येणार नाही, असा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.