अपमानित झालेली अभिनेत्री आमदार ! सभागृहात परतली ती मुख्यमंत्री होऊनच

Jayalalithaa

एका महिलेनं तामिळनाडूचं राजकारण आपल्या मुठीत ठेवलं. एमजीआरची लीगसी टिकवली. एक अभिनेत्री जिनं लाखोंच्या हृदयावर राज्य केलं आणि राजकारणात आली ती तामिळनाडूची अम्मा (आई) म्हणूनच. त्यांचं नावं होतं जयललिता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक वाईट प्रसंगांना तोंड देत, टीकाटिप्पण्या पचवत, कट कारस्थानं आणि पक्षांतर्गत विरोधाला बगल देत त्यांनी सिंहासन मिळवलं. या राजकारणाच्या महाभारतात एक अंक लिहिला गेला. ज्यात काहींना दुर्योधनाची, कुणाला कौरवांची तर जयललितांना (Jayalalithaa) द्रौपदी म्हणलं गेलं. हे घडलं होतं तामिळनाडूच्या विधिमंडळात.

एमजीआर त्या वेळचे तामिळनाडू सिमनेमातले सुपर स्टार. नंतरच्या काळात राजकारणात आले आणि मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली. एमजीआरसोबत २८ सिनेमे सुपरहिट देणाऱ्या जयललितांनासुद्धा राजकीय समज चांगली होती. १९८२ साली जयललिता राजकारणात आल्या. प्रभावी इंग्रजी बोलणं. मुद्देसूद मांडणी. यावर प्रभावित होऊन एआयडीएमकेचे प्रमुख एमजीआर यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. काळ पुढे सरकत होता तशा जयललिता प्रसिद्धी शिखरावर पोहचत होत्या. पक्षात त्यांचा दबदबा वाढीस लागायला सुरुवात झाली. १९८७ ला एमजीआर यांचं निधन झालं. अंत्ययात्रा निघाली. एमजीआर यांच्यानंतर सूत्रं जयललितांच्या हाती येतील याची कल्पना एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांना होती. जानकी रामचंद्रन आणि त्यांच्या समर्थकांनी एमजीआर यांच्या अंत्ययात्रेतच जयललितांशी दुर्व्यवहार केला. जयललितांचे समर्थक आणि जानकी रामचंद्रनचे समर्थक आपसात भिडले. गटबाजीसमोर आली. जयललितांनी डाव आखला. यशस्वी केला. एमजीआर यांच्या उत्तराधिकारी म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं.

२५ मार्च १९८९ तो दिवस जेव्हा जयललितांनी घेतली होती शपथ.

१९८९ तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत जयललिता गटाने २७ जागा जिंकल्या. त्या विरोधी पक्षनेत्या बनल्या. तामिळनाडूच्या त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या. या दिवशी तामिळनाडू विधानसभेत बजेट सादर होणार होतं. जयललिता उठल्या आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. नंतर तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी बजेट सादर करत असताना दोन्ही पक्षांच्या आमदारांची झडप झाली. एकमेकांवर पेपर, बुट फेकले गेले.

अपमानित झालेल्या जयललितांनी घेतली शपथ आणि सभागृहातून बाहेर पडताना डीएमकेचे मंत्री दुरई मुरगण यांनी जयललितांचा रस्ता अडवत त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न केला. माध्यमांनी डीएमकेवर कडाडून टीका केली. जयललिता यांना द्रौपदी तर करुणानिधींचा उल्लेख दुर्योधन असा केला. अपमानित जयललितांनी त्यावेळी शपथ घेतली. “जोपर्यंत महिलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्याची क्षमता या सदनात येणार नाही, तोपर्यंत सदनात पाय ठेवणार नाही.” या दिवसानंतर जयललितांनी सदनात पाय ठेवला तो मुख्यमंत्री म्हणूनच. १९९१ ला त्यांचं पहिल्यांदा सरकार आलं ते काँग्रेससोबत. २४ जून १९९१ ला त्या तामिळनाडूच्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनल्या.

१ रुपया प्रतिमाह मानधन, साठवले होते ६७ कोटी रुपये

१९९१ ला मुख्यमंत्री बनणाऱ्या जयललितांनी त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी असल्याचं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री असाताना १ रुपया प्रतिमाह वेतनावर त्यांनी काम केलं होतं. असं असताना फक्त पाच वर्षांत त्यांची संपत्ती वाढून ६६.६५ कोटी रुपये झाली होती. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

तुरुंगातून परतल्या एक्शन मोडमध्ये

भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाणाऱ्या जयललितांना यानंतर मोठ्या पेचप्रसंगांना सामोरं जावं लागलं. तरी त्यांनी विधानसभा जिंकली. २००१ ला त्या सत्तेवर आल्या. मुख्यमंत्रिपदी बसल्या बसल्या त्यांनी तामिळनाडूत लॉटरी तिकिटांवर बंदी घातली. पशुबळींवर बंदी घातली. आंदोलन करणाऱ्या दोन लाख कामगारांना कामावरून कमी केलं. शेतकऱ्यांना होणारं मोफत वीज वाटप थांबवलं. यानंतर कोर्टानं त्यांचं पद अवैध ठरवलं. त्या एक वर्ष मुख्यमंत्रिपदापासून दूर राहिल्या. २००२ ला पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. २००४ च्या लोकसभेत दारुण पराभवानंतर त्यांनी पशुबळीवरची बंदी उठवली. आणि शेतकऱ्यांना मोफत वीज वाटपाला सुरुवात केली.

५ डिसेंबरला घेतला जगाचा निरोप तामिळनाडूच्या राजकारणावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या जयललितांनी ५ डिसेंबरला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Disclaimer :’संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER