राजकारणाच्या नादात कोरोना योद्ध्यांचा अवमान : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी उभा महाराष्ट्र जीवाचं रान करून लढत आहे. भाजपवाले मात्र कुठे टाळ्या वाजव, कुठे थाळ्या वाजव आणि आज काय तर काळे झेंडे दाखवा, असे प्रकार करीत आहे. असं करून ते उभ्या महाराष्ट्राशी द्रोह करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

कोरोनाशी संघर्ष करताना, झुंज देताना गेले दोन-अडीच महीने प्राणांची बाजी लावून डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, ग्रामदक्षता समित्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स हे योद्धे लढत आहेत. या सगळ्या योद्ध्यांचा ते अपमानच करीत आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.

कोरोनाने चीन, अमेरिका या राष्ट्रांमध्ये कितीतरी मृत्यू होत आहेत, कितीतरी लोक बाधित आहेत. त्यामानाने महाराष्ट्राने सगळ्यात पहिलं लॉकडाऊनचे पाऊल उचलले. कोरोनाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे अधिवेशन बरखास्त केले आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन बरखास्त झालं. मध्यप्रदेशच्या राजकारणापायी केलेल्या या खटाटोपात या मधल्या काळात 35 लाख लोक परदेशातून आले आणि हा संसर्ग वाढतच गेला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेळेवरच जर लॉकडाऊन केल असतं तर 135 कोटी लोकांना घरात बसावं लागलं नसतं, असेही ते म्हणाले.

वास्तविक, भाजपने आम्हाला सूचना करायला हव्या होत्या, अशा काळात सहकार्य करायला हवे होते. परंतु; ते सातत्याने राजकारणच करीत आहेत. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आता लोकांच्या डोळ्यासमोर आला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते सातत्याने बोलत आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे पीपीई किट घालून हिंडत आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अस्वस्थ झाले आहेत. त्या नैराश्यातूनच ते सतत राज्यपालांकडे जाऊन तक्रारी देत आहेत. म्हणूनच त्यांनी राजभवनावावरच राहायला एक खोली घेतली तर फार बरं होईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्र हे देशाचं महाद्वार आहे. येथे सुरुवातीला परदेशातून लोक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा संसर्ग वाढतच गेला. ग्रामीण भागात अतिशय चांगले वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यात जर हा संसर्ग रोखू शकलो तर अजूनही चांगलं होईल.

पीएम केअरमधून किती पैसे महाराष्ट्राला दिले, या प्रश्नावर ते म्हणाले, पीएम केअरला सगळे पैसे मुंबईमधून गेले आणि आम्हाला अवघे चारशे कोटी दिले. तिकडे उत्तरप्रदेशला मात्र पंधराशे कोटी दिले. हा कुठला न्याय आहे ?असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. पॅकेज म्हणून जे वीस लाख कोटी दिलेत ते सगळं कर्जच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

त्यांचे डोळे पांढरे होतील
महाविकास आघाडी सरकार कसं अडचणीत येईल . सरकार समोरील आर्थिक अडचणी कशा वाढतील, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. ते काही करोत; परंतु महाराष्ट्र सरकार बाराबलुतेदार व कष्टकऱ्यांना असं मोठे पॅकेज देईल की विरोधकांचे डोळे पांढरे होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला