सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाची सुधारणा करण्याचे निर्देश

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा

मुंबई :- सोलापूर येथील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सुधारणा करण्याबरोबरच या रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध अडचणींबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले की, सोलापूर येथील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना औषधे आणि विविध तपासण्यांसाठी बाहेर जावे लागू नये यासाठी अधिष्ठात्यांनी लक्ष द्यावे. बालमृत्यू रोखणे, लहान मुलांची काळजी याला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महाविद्यालयात सुरु करण्यात येणारा बर्न वार्डचा तसेच किमान 100 बेडचे नर्सिंग होम सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागास सादर करण्यात यावा. याशिवाय या महाविद्यालयात ट्रॉमा सेंटर, बर्न वार्डच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या. अपंग रुग्णास रुग्णालयाने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र संबंधित जिल्हा रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांना देण्याचे अधिकार देण्यात आले असल्याने हे प्रमाणपत्र रुग्णांना देण्यात यावे अशा सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.