शाळांची प्रसाधनगृह अद्यावत करण्याची सूचना

Instructions for updating the school toilet

रत्नागिरी/प्रतिनिधी :- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलींची प्रसाधनगृहे सर्व सुविधांनी युक्त अद्यावत करण्याच्या सूचना आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी केल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुतसार रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच हजार शाळांची प्रसाधनगृहेदेखील अद्यावत होणार आहेत.

यु-डायस अहवालानुसार राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते बारावीपर्यंत ६६ हजार ७५० शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. स्वतंत्र स्वच्छतागृहाबाबत यापूर्वीही सूचना करण्यात आल्या होत्या. स्वच्छता गृहाच्या देखभाल दुरूस्तीअभावी शिवाय स्वच्छता नसल्याने विद्यार्थिनी कडून प्रसाधनगृहाबाबत नाराजी होती.  परिणामी वापर नसल्यासारखाच होता. किशोरवयीन विद्यार्थिनीची अस्वच्छ प्रसाधनगृहामुळे गैरसोय होत होती. किशोरवयीन विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्यदायी वातावरण तयार करण्याची आवश्यकता असल्याने अद्यावत प्रसाधनगृहांची सूचना करण्यात आली आहे.

अद्यावत प्रसाधनगृहाच्या उभारीसाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळांना निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीव्दारे प्रसाधनगृहे अद्यावत केली जाणार आहेत. प्रसाधनगृहे अद्यावत करताना विविध सूचनांची पूर्तता करावी लागणार आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात आरसा, सामान अडकवण्यासाठी हूक, कचरापेटी, पाणी साठवण्यासाठी बादली व मग, हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देण्याबरोबर प्रसाधनगृहात विजेची सुविधा करावी लागणार आहे. किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी या सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  बहुतांश शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध असल्या तरी देखभाल व दुरूस्ती बरोबरच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत नसल्याने वापर होत नाही.