मुलींपेक्षा मुलांना शपथ द्यावी : पंकजा मुंडे

Pankaja Munde

अमरावती : व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमविवाह करणार नाही, अशी मुलींना शपथ देणा-या महाविद्यालयावर भाजप नेत्या पंकजा मुंडे जाम भडकल्या असून त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे, असे मत ट्विटरवरून त्यांनी व्यक्त केले आहे.
एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अॅसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने पाहणार आणि जर कोणी बघितले तर त्याला जबरदस्त जबाब देणार असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ दिली. सध्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या शपथेची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ही शपथ घेतली, असा कयास लावला जात आहे. पण राजकिय स्तरातून या शपथ विधी कार्यक्रमाचा निषेध नोंदवला आहे.

खळबळ! मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही! विद्यार्थिनींना दिली शपथ

“मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते, अशी शपथ या मुलींनी घेतली.

कुमारवयात मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळत नाही. त्यामुळे आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची त्यांना जाणीव नसते. यामुळे ही शपथ घेतल्याचे महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांनी म्हटले आहे.