कोविडवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्ही राजकीय स्कोअर सोडविण्यात व्यस्त – मिलिंद देवरा

Milind Deora

मुंबई : सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या. बॉलिवूडमधील नेपोटिझम. बिहार पोलिसांची मुंबईत एन्ट्री. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी बिहार सरकारसह राज्यातील भाजपची उत्सुकता…  या सर्व प्रकरणात प्रकर्षाने वेळोवेळी ठाम मत मांडणारी अभिनेत्री कंगना रणौतचा टिवटिवाट. पुढे हे प्रकरण इतके चिघळले की, कंगना विरुद्ध शिवसेना असे चित्र राज्यात उभे राहिले.

कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणे, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधणे, मी मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत  असेल तर मला अडवून दाखवा, अशा विविध वक्तव्यांतून  कंगना सतत चर्चेत राहिली आहे. यातून कंगना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष वाढत गेलेला राज्याने पाहिला. याच पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र कोरोनाशी गंभीररीत्या लढत आहे. राज्यात कोरोनाने कहर केला आहे. त्याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, कोविड कारभारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आम्ही राजकीय स्कोअर सोडविण्यात व्यस्त आहोत, असे मिलिंद देवरा म्हणाले.

तसेच, कोविडच्या या काळात राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची आणि आपल्या  प्रायोरिटीज ठरविण्याची गरज आहे, असेही मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, ठरल्याप्रमाणे कंगना रणौत आज मुंबईत परतली आहे. तिला केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. वाय दर्जाची सुरक्षा मिळवणारी कंगना पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. तसेच, कंगना मुंबईत येण्यापूर्वीच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपाने तिचे मुंबईतील कार्यालयावर अवैध बांधकाम सांगत आज हातोडा चालवला.

मुंबई उच्च न्यायालयाने हे तोडकाम थांबविले  आहे. दरम्यान, कंगनाचे मुंबईला पाकिस्तान संबोधणे, वेळोवेळी मुंबई विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यावरून कंगनाचा अनेक स्तरांतून विरोध करण्यात येत आहे. तसेच, मनपानेही कंगनाच्या कार्यालयावर आताच जेसीबी चालवणे गरजेचं होतं का, असाही प्रश्न बॉलिवूडमधून उपस्थित केला जात आहे.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER