अज्ञात शिवभक्तांकडून शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

Shivaji Maharaj Idol
  • एमआयडीसीच्या जागेवर रात्रीतून केली स्थापना
  • शिवभक्त संतापताच माजी खासदार खैरे व आमदार परतले

औरंगाबाद : मोहटादेवी मंदिर, बजाजनगर परिसरातील रामलीला मैदानाच्या समोरील खदानीलगतच्या जागेवर शनिवारी पहाटे अज्ञात शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व एमआयडीसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यादरम्यान याच जागेवर सायंकाळी समस्त शिवभक्तांच्या वतीने प्रा. जावेद शेख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा खदान परिसरातील जागेवर बसवण्याची मागणी येथील नागरिकांतून लोकप्रतिनिधीकडे केली जात होती. विशेष म्हणजे पुढारीसुद्धा निवडणुकांच्या तोंडावर पुतळा बसवण्याचे तसेच तो परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन देत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते. दरम्यान, शनिवारी पहाटे अज्ञात शिवभक्तांकडून संबंधित जागेवर पुतळा बसवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियातून व्हायरल झाली. दिवसभर शेकडोंच्या संख्येत शिवभक्तांनी या ठिकाणी भेट देऊन परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.

भाजप पदाधिकाऱ्यांची शिवीगाळ; नाईकांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

सायंकाळी प्रा. जावेद शेख यांचे शिवचरित्रावर व्याख्यान असल्याने मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी स्थानिक पुढारी व शिवभक्तांची उपस्थिती होती.

किरकोळ वाद होताच आमदार, माजी खासदार परतले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजाअर्चा होताच एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने सदरील मूर्ती स्थापनेचे श्रेय माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना देण्याचा प्रयत्न मनोगतातून व्यक्त करताच संतापलेल्या शिवभक्तांनी सदरील मूर्तिस्थापना ही कोण्या पुढाऱ्यांच्या नव्हे, तर समस्त शिवभक्तांनी उभी केल्याचे ठणकावून सांगत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर माजी खासदार खैरे, आमदार संजय शिरसाट आदींसह मोजक्या शिवसैनिकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे व्याख्यान झाले.

सदरील जागेची प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या सुट्या असल्याने वरिष्ठ सुटीवर आहेत, ते आल्यानंतर चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे उपअभियंता बी. एस. दिपके यांनी सांगितले.