जावेद अख्तर यांच्या कंगनाविरोधातील तक्रारीची चौकशी सुरु

Inquiry into Javed Akhtar's complaint against Kangana begins

कंगना रनौतने (Kangana Ranaut) बॉलिवुडमधील सगळ्यांशी पंगा घेतला आहे. ऋतिक रोशन प्रकरणावरून कंगनाने प्रख्यात गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावरही टीकास्र सोडत आरोप केले होते. जावेद अख्तर यांनी याबाबत कंगनावर मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आणि तक्रार दाखल केली. मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांनी कंगना रनौतच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. काल जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडत तक्रारची दखल घेण्याची विनंती केली. तेव्हा न्यायालाने जुहू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

कंगनाला आता सर्व बाजूंनी घेरण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. कंगनाने सर्वप्रथम ऋतिकसोबतचे ईमेल चॅट जाहीर केले होते. कंगनाने हे गुगल चॅट अकाउंट हॅक करून मिळवल्याची तक्रार ऋतिक रोशनने सायबर सेलकडे केली होती. त्या प्रकरणाची चौकशीही आता सायबर सेल सुरु करणार आहे. त्यातच आता जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीचीही चौकशी सुरु केली जाणार असल्याने कंगनाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

जावेद अख्तर यांनी 2 नोव्हेंबर रोजी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमक्ष फौजदारी तक्रार दाखल करीत मानहानी संबंधी कलमांखाली कारवाई करण्याची विनंती केली होती. कंगनाने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केल्याने माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. ऋतिक रोशन प्रकरणात मी तिला घरी बोलावून माफी मागण्यास सांगितल्याचा खोटा आरोपही कंगनाने केल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले होते. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांचा जबाब नोंदवला होता. कंगनाची बहीण रंगोलीनेही जावेद अख्तर यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER