
मुंबई :- बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत समोर आली आहे. याच तरुणाला भाजपने उत्तर मुंबई (Mumbai) अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिल्याचे समोर आले आहे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने बांग्लादेशच्या एका नागरिकाला उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे युवक जिल्हाध्यक्षपद दिले आहे. पोलिसांच्या धाडीत हे उघड झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून भाजपच्या या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. एककीडे भाजपकडून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. पण आता भाजपचे कार्यकर्तेच बांग्लादेशी असल्याचं उघड झालं आहे. महेश तपासे यांनी गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
या युवकाने तयार केलेली त्याची सर्व कागदपत्रे ही बनावट असल्याचेसुद्धा उघड झाले आहे. देशद्रोहाची भाषा करणारे भाजपाचे नेते मात्र या प्रकरणात गप्प का आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुंबई व महाराष्ट्रातील अल्पसंख्याक बांधव भाजपला मानत नसून आता त्यांना बांग्लादेशी अल्पसंख्याकांना पद देण्याची नामुष्की आलेली आहे. बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भाजपच्या पदाधिकार्यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.
ही बातमी पण वाचा : शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला