
मुंबई :- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते अशी माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात असा दावा करणे हे अतिशय गंभीर प्रकरण असून, या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करा आणि परमवीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करा, अशी मागणी भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. याबाबत त्यांनी समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पुराव्यांसह इतके गंभीर आरोप करून दोन दिवसात राज्य सरकार कडून चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राबाबत दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या खुलासा पत्रात परमवीर सिंग यांच्या कोणत्याही आरोपांचे खंडन करण्यात आले नाही, त्यामुळे परमवीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे.
ही बातमी पण वाचा : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, चौकशीच्या मागणीसाठी परमबीर सिंग सुप्रीम कोर्टात
या प्रकरणात नावे असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे, पोलीस उपायुक्त भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केल्यास आणखी सत्य उघड होईल. यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होतो आहे, त्यामुळे या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून २४ तासांत गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात जाईन, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.
किती वसुली केली ?
समतानगर पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बार, रेस्टॉरंट, पब यांच्याकडून किती खंडणी आतापर्यंत वसूल करण्यात आली आहे व ती कोणी वसुली केली, याची चौकशी करा, अशीही मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
१०० कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा, या मागणीसाठी मी आज समतानगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.@AnilDeshmukhNCP @PawarSpeaks pic.twitter.com/21PeqVdC3H
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 22, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला