पीडितेला ‘अविश्वसनीय’ ठरवून बलात्कार आरोपीची निर्दोष सुटका

nagpur HC & Pocso
  • ‘पॉक्सो’ खटल्यात नागपूर खंडपीठाचा निकाल

नागपूर : बलात्कारपीडिने दिलेली साक्ष विश्वासार्ह असेल तर तेवढया आधारावरही आरोपीला दोषी ठरविले जाऊ शकते, हे खरे असले तरी या खटल्यातील पीडितेची जबानी तशी विश्वसनीय नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (POCSO ACT) खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

१७ वर्षे नऊ महिने वयाच्या एका मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द येथील जगेश्वर वासुदेव कावळे या २७ वर्षीय ड्रायव्हरला तेथील सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध जगेश्वरने केलेले अपील मंजूर करताना न्या. पुष्पा गणेरीवाला यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणातील पीडित मुलगी मुळची वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील आहे. ती इयत्ता ११ वीचे शिक्षण घेण्यासाठी  हिंगणघाट येथे एका भाड्याच्या खोलीत राहात होती. आरोपी जगेश्वरही तेथे भाडेकरू होता. मुलगी आजारी असताना जगेश्वरने तिला मदत केल्याने दोघांमध्ये चांगले सबंध होते. इयत्ता ११ वीची परीक्षा झाल्यावर मुलगी थोडे दिवस उमरी येथे आपल्या घरी गेली. नंतर ती इयत्ता १२ वीच्या क्लाससाठी ती पुन्हा हिंगणघाटला आली. तेथे जगेश्वर तिला बस स्टँडवर ‘रीसिव्ह’ करायला आला होता. जगेश्वर तिला घेऊन आधी गोसिखुर्द येथे आपल्या घरी घेऊन गेला. तेथून जगेश्वर तिला घेऊन आपल्या बहिणीच्या घरी सिंहला गावी (जि. चंद्रपूर) गेला. तेथे ही दोघं दोन महिने राहिले. त्याच दोन महिन्यांच्या काळात तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याच्या आरोपावरून जगेश्वरवर हा खटला भरला गेला होता.

न्या. गणेरीवाला यांनी निकालपत्रात लिहिले की, अभियोग पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले असले तरी प्रत्यक्ष बलात्काराच्या आरोपाशी संबंधित अशी साक्ष फक्त पीडित मुलीचीच आहे. पण ज्यावर विसंबून आरोपीला दोषी धरावे एवढी मला तिची साक्ष बिलकूल विश्वासार्ह वाटत नाही.

याचे कारण नमूद करताना न्यायमूर्ती म्हणतात, या मुलीची साक्ष पाहिल्यास ती आरोपीच्या कशी व किती प्रेमात होती हेच त्यातून दिसते. आरोपी व पीडित मुलीला सर्वप्रतण हिंगणघाट पोलिसांकडे नेले तेव्हा त्यांच्याकडे तिने आरोपीने बलात्कार केल्याचा चकार शब्दानेही उल्लेख केला नाही. आधी ही मुलगी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यायलाही तयार नव्हती. दंडाधिकाºयांनी तिला जिलहा बाल कल्याण समितीकडे पाठविल्यावर समितीने तिला वैद्यकीय तपासणी करून घेण्यास राजी केले. या तपासणीतून ही मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

न्यायालय म्हणते की, आपण गरोदर आहोत हे कळल्यावरही या मुलीने त्या संदर्बात जगेश्वरचे नाव घेतले नाही. किंवा ती जगेश्वरमुळेच गरोदर राहिली हे सिद्ध करण्यासाठी त्याची ‘डीएनए’ चाचणीही घेण्यात आली नाही. अशा पार्श्वभूमीवर या मुलीने न्यायालयातील फक्त सरतपासणीत जगेश्वरवर केलेला बलात्काराचा आरोप ज्याच्या आधारे त्याला दोषी धरून १० वर्षे कैदेत टाकावे एवढा विश्वासार्ह वाटत नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER