नवविवाहितेच्या खुनाच्या आरोपातून पती, दीर व सासूची निर्दोष मुक्तता

Bombay High Court
  • माळशिरसच्या कुटुंबाला हायकोर्टाकडून दिलासा

मुंबई :- नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या पुराव्यांवरून स्पष्ट दिसत असूनही तिचा खून केल्याबद्दल दोषी ठरवून ठोठावलेली जन्मठेप रद्द करून उच्च न्यायालयाने तिचा पती, दीर व सासूची तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली. सोलापूर जिल्ह्यातील मााळशिरस येथील ‘रामरथ’ मंगल कार्यालयाचे मालक असलेल्या टेके कुटुंबातील धाकटी सून मेघा हिचा ६ सप्टेंबर, २०१० रोजी म्हणजे लग्नानंतर जेमतेम दोन महिन्यांनी गळफासाने मृत्यू झाला होता. मेघाची मोठी जाऊ ईश्वरी तिच्या झोपायच्या खोलीचा केर काढण्यासाठी गेली असता दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ ठोठावूनही  मेघाने दरवाजा उघडला नाही म्हणून दरवाजाला भोक पाडून लॅच उघडले असता मेघा ओढणीने गळफास घेऊन लटकताना आढळली होती.

या घटनेवरून म्हाळशिरस पोलिसांनी मेघाचे पती सचिन, मोठा दीर सुनील, सासरे रामचंद्र व सासू सुमन यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे (भादंवि कलम ४९८-ए), खून (कलम ३०२) व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल केला. सत्र न्यायालयाने या सर्व गुन्ह्यांसाठी चारही आरोपींना दोषी ठरवून जून २०१२ मध्ये जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात केलेली अपिले मंजूर करून न्या. साधना जाधव आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने चारही आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. अपिल प्रलंबित असताना सासरे रामचंद्र यांचे निधन झाले होते.

खंडपीठाने म्हटले की, उपलब्ध साक्षी-पुराव्यांवरून स्पष्ट दिसते की, गणितात एम. एस्सी. असलेल्या मेघाला बी.एड. करायचे होते. परंतु तिच्या घरच्यांनी चांगले स्थळ आल्याने, तिचे झटपट लग्न करून दिले. यामुळे नाराज असलेल्या मेघाने गळफास लावून आत्महत्या केली असावी. मेघाचा मृृत्यू लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत झाला हे खरे असले तरी तेवढ्यावरून, कोणतेही सबळ पुरावे नसताना तिच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबावर तिच्या खुनाचा काळिमा फासला जाऊ शकत नाही.

हा निकाल देताना खंडपीठाने पुढील गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या : मेघा घरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली तेव्हा तिचा पती ४५ किमी अंतरावर पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ड्युटीवर होता. मेघाच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केलेला होता. लग्नानंतरच्या दोन महिन्यांत तिचा कोणत्याही प्रकारे छळ झाल्याचा पुरावा नाही.  मेघा संवेदनशील मनाची होती व  इयत्ता १२ वीत शिकत असतानाही कमालीचे वैफल्य वाटू लागल्याने तिच्यावर सोलापूर येथील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेण्यात आले होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button