‘पॉक्सो’ खटल्यातील आरोपीची बलातकारातूनही निर्दोष मुक्तता

Innocent acquitted of rape in POCSO case
  • नागपूर खंडपीठ (Nagpur bench) म्हणते मुलीची साक्ष अविश्वसनीय

नागपूर: बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबधक कायद्याखालील (POCSO ACT) खटल्यातील एका आरोपीच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘पॉक्सो’ गुन्ह्यातील त्याच्या निर्दो षित्वार शिक्कामोर्तब करत असताना त्याची भारतीय दंड विधानाखालील बलात्काराच्या गुन्ह्यातूनही निर्दोष मुक्तता केली.

यवतमाळ शहरातील पारवा झोपडपट्टीत राहणार्‍या सूरज चंदू कासरकर या मजुराने केलेले अपील मंजूर करून न्या. पुष्पा डी. गनेडीवाला यांनी अलीकडेच हा निकाल दिला. शेजारी राहणार्‍या १५ वर्षाच्या मुलीच्या घरात घुसून तिच्यावर २६ जुलै २०१३ रोजी बलात्कार केल्याचा ‘पॉक्सो’ कायद्याखालील खटला सूरजवर दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मुलगी घटनेच्या दिवशी किमान १८ वर्षांची होती, असा निष्कर्ष नोंदवून विशेष न्यायालयाने सूरजला ‘पॉक्सो’खालील बलात्काराच्या गुन्ह्यात निर्दोष ठरविले होते. मात्र दंड विधानातील बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल त्याला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

फिर्यादी मुलगी घटनेच्या दिवशी अल्पवयीन नव्हती हा खालच्या न्यायालयाने काढलेला निष्कर्ष योग्य ठरविताना अपिलाच्या निकालात न्या. गणेरीवाला यांनी म्हटले की, या फिर्यादी मुलीने साक्षीमध्ये स्वत:चे वय १८ वर्षे सांगितले आहे. शिवाय आईच्या सांगण्यावरून पोलिसांकडे फिर्याद करताना आपण आपले वय १५ वर्षे सांगितले, असेही तिने सांगितले आहे. मुलगी घटनेच्या वेळी १५ वर्षांची होती हे दाखविण्यासाठी अभियोग पक्षाने तिचा जन्मदाखला सादर केला असला तरी तो निर्णायकी पुरावा ठरत नाही. कारण तो ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू नोंदणीबुकातील असली उतारा नाही. शिवाय हा जन्मदाखला विहीत नमुन्यातही नाही.

त्या दिवशी रात्री आई नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेली असता आरोपी घरात शिरला. तेव्हा आपण पलंगावर झोपलो होतो व  आपला धाकटा भाऊ खाली जमिनीवर झोपला होता. आरोपीने ओपले तोंड दाबून धरले. त्याने स्वत:चे व आपले कपडे काढले आणि त्याने बलात्कार केला. आई घरात आल्याचे पाहताच तो पळून गेला, अशी या मुलीची फिर्याद होती.

न्या. गनेडीवाला यांनी फिर्यादीतील या वर्णनावरून हा बलात्काराऐवजी संमतीने केलेल्या लैंगिक समागम असण्याची शक्यता अधिक वाटते, असा निष्कर्ष काढून सूरजची बलात्काराच्या गुन्ह्यातूनही निर्दोष मुक्तता केली. निकालपत्रात त्या लिहितात, आरोपीने एका हाताने या मुलीचे तोंड दाबून धरलेले असताना दुसºया हाताने त्याने दोघांचेही कपडे काढून बलात्कार करेपर्यंत या मुलीने जराही प्रतिकार केला नाही. त्यांच्यात जराही झटापट झाली नाही, हे अविश्वसनीय वाटते. निदान आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत तरी झटापट झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. उलट मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिला लैंगिक समागमाची सवय असल्याचा निष्कर्ष निघाला. अशा तकलादू साक्षी-पुराव्यांवर आरोपीला दोषी धरणे अयोग्य होईल, असे त्यांनी म्हटले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER