इंजेक्शन, धमक्या आणि सेफ्टी बबल्स…

Adar Poonawalla - Coronavirus Vaccine - Editorial - Maharashtra Today
Adar Poonawalla - Coronavirus Vaccine - Editorial - Maharashtra Today

Shailendra Paranjapeसीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना लसीच्या मागणीसाठी फोनवरून धमक्या येत असल्याने त्यांनी आपला मुक्काम पुण्यातून थेट लंडनला हलवला आहे. थेट पंतप्रधानांना उद्देशून ट्विट करू शकणाऱ्या पूनावाला यांच्यावर ही वेळ आली आणि त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ अशी एक म्हण आहे आणि त्याचा थोडक्यात अर्थ असा की, एखादी गोष्ट आपण स्वीकारली की त्या गोष्टीच्या चांगल्यावाईट परिणामांसह स्वीकारावी लागते.

आपापल्या कामाच्या निमित्ताने घर सोडून दुसऱ्या गावात मोठ्या शहरात, राज्याबाहेर किंवा प्रसंगी देशाबाहेरही जाऊन काही नोकरदारांना राहावे लागते. ते आपापल्या मूळ गावापासून दूर जातात, सगेसोयरे मित्रमंडळी यांना सोडून जातात आणि नव्या गावात, शहरात, राज्यात, देशात नवे मित्र जमवतात, नव्या परिस्थितीशी जुळवून घेतात. बहुतांश वेळा मूळ गावापेक्षा नोकरीचे ठिकाण किंवा शहर, देश अधिक प्रगत, भौतिक सुखसोयींचा असला तर त्या माणसाचं राहणीमानही बदलतं. ‘सिंगम’ सिनेमातल्या संवादासारखं, तू हमारा गोट्या नही रहा, असं म्हणायची वेळ त्याच्या जुन्या मित्रांवर येते. काही लोकांच्या बाबतीत सरकारी किंवा बँकेच्या नोकरीमुळे देशांतर्गत, राज्यांतर्गत बदल्या होतात आणि मग काही लोकांना त्यांच्या मूळ गावाच्या, शहराच्या तुलनेत कमी प्रगत किंवा कमी सुखसोयी असलेल्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं.

हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे कोरोनाच्या संकटाच्या काळात आणि विशेषतः आता देशभर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी प्रसारमाध्यमांमधून एक बातमी आली आणि त्यात देशातले बडे उद्योगपती सेफ्टी बबल्समध्ये गेल्याचे नमूद करण्यात आले होते. संपूर्ण देशासाठी आपल्या रिफायनरीमध्ये प्राणवायुनिर्मिती सुरू करून तो मोफत देणारे मुकेश अंबानी, गौतम अडानी असे उद्योगपती तसंच इन्फोसिससारख्या आयटी कंपन्यांचे सर्वेसर्वा हे सारे लोक कुठे ना कुठे सुरक्षित ठिकाणी जाऊन राहिले आहेत. कोरोना संकटाच्या काळात कुणी कुठे राहावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे सेफ्टी बबलमध्ये राहण्यात काही वावगे नाहीच. पण आपल्या समाजात अशा बातम्या आल्यानंतर, ते आणि आपण ही तुलना सर्वसामान्यांच्या विशेषतः या सर्व झगमगाटापासून दूर असलेल्या आणि कसंबसं दोन वेळचं जेवण पोटात ढकलून आला दिवस साजरा करणाऱ्यांसाठी मात्र जखमेवर मीठ चोळणाऱ्या ठरू शकतात.

कोरोनामुळे लावलेल्या कडक निर्बंधांमुळे लोक घरात कैद आहेत आणि एरवी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने तिथूनच स्वतःसाठी आणि देशासाठीही संपत्ती निर्माण करणारे कोरोना क्रायसिसच्या काळात मुंबई सोडून जातात, हे मुंबईत तुम्ही सुरक्षित नाही, हेच अधोरेखित करतात. उद्योगपती सेफ्टी बबलमध्ये जातील; पण सामान्यांनी काय करायचं? त्यांनी असुरक्षित बबलमध्येच राहायचं, दुसरं काय?

परदुःख शीतल, असं सांगितलं जातं. बघा सीरमसारख्या इतक्या मोठ्या कंपनीचा आदर पूनावाला पण राजकारण्यांच्या तगाद्यामुळे घर आणि देश सोडून लंडनला जाऊन राहिला आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर एका महाभागाने दिली आणि हे लिहिण्यास उद्युक्त झालो. मुळात अंबानी, अडानी हे कोरोनामुळे मुंबईत सुरक्षित वाटत नसल्याने गुजरातमध्ये जाऊन राहिलेत. पूनावाला यांना धमक्या आल्याने ते लंडनला गेलेत, असं त्यांनी स्वतःच लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याचं वृत्त प्रसारित झालंय.

राज्यात पोलीस खात्यात सुरू असलेले नाट्य आणि त्यावरून झालेले थेट गृहमंत्र्यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची बदली हे सारं झाल्यानंतर आदर पूनावाला यांना लंडनला जाऊन राहावं लागलं असेल तर पोलीस या गोष्टीची सुओमोटू म्हणजे स्वतःहून दखल घेतील का? एका मोठ्या कंपनीच्या प्रमुखाला केंद्र सरकार विशेष सुरक्षा पुरवते आणि त्याला धमक्यांमुळे देश सोडून जावा लागतो. त्यामुळे त्यांना धमक्या देणारेही शोधून काढायला हवेत आणि त्यांच्यावर कारवाईही व्हायला हवी. गुन्हा हा गुन्हा असतो आणि सामान्य माणसाने अगदी शपथेवर जरी सांगितलं की, नो एंट्रीचा बोर्ड पाहिला नाही, तरी कायद्याच्या भाषेत आणि तरतुदींनुसार इग्नरन्स किंवा इनोसन्स हे तुम्हाला निर्दोष ठरवायला पुरेसे कारण ठरू शकत नाही. तेच तत्त्व पूनावाला यांच्यासंदर्भात लागू करायला हवे आणि त्यांनी तक्रार दाखल केली नसेल तरीही पोलिसांनी त्यांच्या या वक्तव्याची दखल घ्यायला हवी. त्यांना धमक्या देणारे शोधून काढले जायला हवेत. तसे झाले तरच राज्यात उद्योगपती सुरक्षित आहेत, असा संदेश जाईल आणि कायद्याचे राज्य आहे, हे लोकांनाही पटेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button