पक्ष्यांसाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद – ॲड. यशोमती ठाकूर

Yashomati Thakur

अमरावती : अमरावती जिल्हा ही समृद्ध पक्षीभूमी आहे. मेळघाटसह विविध ठिकाणी वसलेल्या अरण्यांतून, तसेच सर्वदूर रानावनांतून समृद्ध पक्षीजीवन पहायला मिळते. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना पर्यावरणाची जपणूक करणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने वनमाला व इतर संस्थांचे कार्य कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

येथील वनमाला बहुउद्देशीय संस्था, स्वराज्य प्रतिष्ठान, साद फाऊंडेशन, दिशा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्ष्यांसाठी जलपात्र बसविण्याचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे सदस्य जयंतराव देशमुख, जितेंद्र ठाकूर,अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील गाले, साद फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रध्दा पाटील, स्वप्ना पवार, प्रणय मेहरे, गौरव कडू, निलेश चौधरी, अक्षय इंगोले, अभी बारगे, प्रसाद पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

पक्षीजीवनाचे संवर्धन करण्यासाठी वनमाला संस्थेसह विविध संस्थांनी एकत्र येऊन राबविलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. जिल्ह्याला जंगल, पक्षी, प्राणीजीवन असा समृद्ध वारसा लाभला आहे. उन्हाळ्यात पक्षी पाण्याच्या शोधार्थ फिरत असतात. त्यांच्यासाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. निसर्गाची जपणूक करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत, हे आश्वासक आहे, अशी भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी विश्रामगृह परिसरात असलेली वृक्षराजी लक्षात घेऊन विविध ठिकाणी जलपात्र बसविण्यात आले. या संस्थांतर्फे इतरही विविध सुमारे दीड हजार जलपात्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER