नाशिक जेलमधील कैद्याच्या आत्महत्येच्या चौकशीची माहिती द्या

  • उच्च न्यायालयाचा तुरुंग प्रशासनास आदेश

मुंबई: जन्मठेप भोगणार्‍या एका ३२ वर्षांच्या कैद्याने गेल्या ऑक्टोबरमध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृहात केलेल्या कथित आत्महत्येची तुरुंग प्रशासनाने जी काही चौकशी केली आहे त्याची सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

असगर अली मन्सूरी नावाच्या कैद्याने गेल्या ७ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली असे तुरुंग प्रशासनाने सांगितले होते. मन्सूरीच्या पार्थिवाचे ‘पोस्ट मार्टेम’ केले तेव्हा त्याच्या पोटात प्लॅस्टिकमध्ये व्यवस्थितपणे गुंडाळलेली एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली होती. ‘माझे काही बरेवाईट झाले तर यांना जबाबदार धरावे’ असे लिहून चिठ्ठीत तुरुंगातील पाच अधिकाºयांचा नावानिशी उल्लेख करण्यात आला होता, असे समजते.

मन्सूरीचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्याची तुरुंग प्रशासन सोडून अन्य त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी केली जावी आणि त्यातून जो निष्कर्ष निघेल त्यानुसार दोषींवर फौजदारी कारवाई केली जावी, यासाठी मन्सूरीचे वडील मुमताज व मानवी हक्कांच्या रक्षणासाठी काम करणारी ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज’ (PUCL) या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तुंरुंग नियमांचे उल्लंघन केल्याची शिक्षा म्हणून मन्सूरीला शेवटचे सहा महिने एकट्याला वेगळ््या कोठडीत ठेवले गेले होते. तेथे कदाचित त्याला बेदम मारहाण केली गेली असावी, असा संशयही याचिकेत व्यक्त केला गेला आहे.

न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली तेव्हा अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर जे. पी. याज्ञिक यांनी सांगितले की, मन्सूरीच्या मृत्यूच्या संदर्भात दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १७६ (१-ए) अन्वये आवश्यक अससेली चौकशी सुरु करण्यात आली आहे, असे मला तुरुंग प्रशासनाने कळविले आहे. शिवाय मानवी हक्क आयोगही या घटनेची चौकशी करत आहे, असे ते म्हणाले.

न्या. पितळे यांनी ‘चौकशी संपली का?’, असे विचारता ती अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, घटनेला तीन महिने होऊन गेले. चौकशीला एवढा वेळ पुरेसा आहे.

याचिकर्त्यांचे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई म्हणाले की, चौकशी केली गेली असेल तर त्याचे काय झाले एवढीच माहिती मला हवी आहे. चौकशी अद्याप सुरु असेल तर मला त्यात सहभागी होऊ द्या, असे माझे म्हणणे आहे. मन्सूरीचा तुरुंगात छळ केला गेला, असे सांगणारे किमान पाच कैदी मला माहित आहेत, असेही ते म्हणाले.

निदान माझ्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्याचा वडील या नात्याने मला नक्कीच हक्क आहे, असेही अ‍ॅड. देसाई म्हणाले.

यावर न्या. पितळे पब्लिक प्रॉसिक्युटला म्हणाले की, दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १७६ (४) नुसार अशा चौकशीत मृताच्या कुटुंबियांना सहभागी होण्याची मुभा आहे. त्यामुळे चौकशीत निदान मन्सूरीच्या वडिलांना तरी सहभागी होऊ द्यायला हवे होते.

तुरुंग प्रशासन जी काही चौकशी केली असे सांगत आहे त्याची सर्व कागदपत्रे कोर्टात सादर करण्यास सांगून याचिकेवरील पुढील सुनावणी १ फेब्रुवारी रोजी ठेवली गेली. मन्सूरीच्या मृत्यूची पोलिसांनी फक्त ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद केली आहे. परंतु कोणताही औपचारिक गुन्हा नोंदविलला नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER