शेतकर्‍यांपुढे अनंत अडचणी पण सरकार मात्र असंवेदनशील! औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केलेली खंत

aurangabad high court

औरंगाबाद : अनंत अडचणींनी ग्रासलेले राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण सरकारी यंत्रणा मात्र त्याविषषयी असंवेदनशील आहे, अशी खंत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (Aurangabad High Court) खंडपीठाने एका निकालपत्रात व्यक्त केली. केळी पिकविणार्‍या शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा गुन्हा जळगाव पोलिसांनी ‘खंडेलवाल ट्रान्सपोर्ट’चे मालक असलेल्या के. डी. व एम. के. खंडेलवाल या पिता-पुत्राविरुद्ध नोंदविला आहे. तो रद्द करण्यासाठी त्यांनी केलेली याचिका फेटाळताना न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी वरीलप्रमाणे भाष्य निकालपत्रात केले.

याचिकेतील घटनेचा संदर्भ देत न्यायमूर्तींनी लिहिले की, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकर्‍यांना सोसाव्या लागणार्‍या अडचणींविषयी सर्वच (शासकीय) यंत्रणा संवेदनशीलता दाखवत नाहीत ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. कोर्टबाजी करणे परवडणारे नसल्याने शेतकर्‍यांना कोणी वाली नाही.

न्यायमूर्तींनी पुढे म्हटले की, शेतकर्‍यांच्या याच अगतिकतेचा याचिकाकर्त्यांसारखे व्यापारी गैरफायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरतात. यापूर्वीही त्रस्त शेतकरी आत्महत्या करत होते. आता त्यात या आणखी एका नव्या कारणाची भर पडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांकडून केळी घेऊन ती व्यापार्‍यांना विकण्याचा दलालीचा धंदा सानिया काद्री करतात. त्यांनीच दाखल केलेल्या फिर्यादीवरून खंडेलवाल पिता-पुत्रांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘तुम्ही केळी आमच्याकडे द्या. जो जास्त किंमत देईल त्याला आम्ही ती विकू’ असे सांगून खंडेलवाल यांनी केळी घेतली. पण माल विकल्यावर पैसे दिले नाहीत, असा काद्री यांचा आरोप आहे. खंडेलवाल यांनी याचा इन्कार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काद्री यांनी आमच्याकडे केळी फक्त ट्रकने वाहतूक करण्यासाठी दिली होती.

ज्या शेतकर्‍यांनी केळी दिली होती त्यांनी पैसे न मिळाल्याने काद्री यांच्याविरुद्धही पिर्याद दाखल केली होती. तो गुन्हा रद्द करण्यासही अन्य एका खंडपीठाने यापूर्वी नकार दिला होता. दरम्यान, सत्र न्यायालयाने काद्री व खंडेलवाल यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश दिला. हे दोघे परस्परांवर जबाबदारी ढकलत असताना नाडल्या गेलेल्या शेतकर्‍यांना पैसे मिळालेले नसूनही सरकार किंवा पोलिसांनी ते वसूल करण्यासाठी काहीच केले नाही, यावरही खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER