म्युकरमायकोसिससाठी साथरोग नियंत्रण कायदा लागू; केंद्राची नवी नियमावली लागू

नवी दिल्ली :- अख्ख जग कोरोनाशी (Corona Virus) लढत असताना त्यातून उद्भवणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’सारख्या नव्या आजाराने मेडिकल जगतासमोर एक नवे आव्हान उभे केले आहे. आरोग्य मंत्रालयाने या आजारासाठीही साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आरोग्य विभागाचे सहायक सचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. देशभरातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना ‘म्युकरमायकोसिस’बाबत (Mucor-Mycosis) साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद असलेल्या नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिससंदर्भात केंद्राने राज्य सरकारलादेखील आवाहन केले आहे. त्यांनीदेखील राज्यपातळीवर ‘म्युकरमायकोसिस’ला साथीचा आजार म्हणून जाहीर करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तेलंगणा, राजस्थान यासारख्या राज्यांनी आधीच या ‘म्युकरमायकोसिस’ला साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे.

बाधित रुग्णांची माहिती द्यावी लागेल
यासंदर्भात सहायक सचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना लिखित स्वरूपात सूचना दिल्या आहेत. साथरोग कायद्यांतर्गत म्युकरमायकोसिसचे व्यवस्थापन केले जावे. ‘म्युकरमायकोसिस’चा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्यसेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. याशिवाय, या आजाराचे संशयित आणि बाधित रुग्णांची आकडेवारी आरोग्य विभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल, असे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

‘म्युकरमायकोसिस’ काय आहे?
‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेश करते. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे. या सर्व प्रकारचा या आजारामध्ये समावेश असून याबाबत वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button