मारीनच्या दुखापतीने सिंधूच्या वाढल्या सुवर्णपदकाच्या संधी

carolina marin pv sindhu - Maharashtra Today

विश्वविजेती बॕडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P.V.Sindhu) हिच्यासाठी अपघाताने का होईना, पण टोकियो आॕलिम्पिक (Tokyo Olympic) सुरू होण्याआधी एक गोष्ट चांगली झाली आहे. ती म्हणजे वर्तमान आॕलिम्पिक विजेती स्पॕनिश खेळाडू आणि सिंधूची चांगली मैत्रिण कॕरोलिना मारीन (Carolina Marin) हिला टोकियो आॕलिम्पिकमधून माघार घ्यावी लागली आहे. मारीनच्या डाव्या गुडघ्यावर या आठवड्यात शस्त्रक्रिया (Knee Surgery) करण्यात येणार आहे.

मारीनच्या अनुपस्थितीचा सर्वाधिक फायदा पी.व्ही. सिंधूला होणार आहे. मारीनने आपल्या माघारीची घोषणा करताना सांगितले की, तिच्या डाव्या पायातील एसीएल लिगामेंट आणि आणखी दोन नसा फाटल्या आहेत आणि त्यावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मारीनने आपल्या संदेशात म्हटलेय की, माझ्यासाठी हा आणखी एक धक्का आहे पण त्यातून मी निश्चितपणे बाहेर येईल. गेल्या दोन महिन्यात तयारी आमच्या नियंत्रणाबाहेर गेली होती,पण आॕलिम्पिकपूर्वी मी तंदुरूस्त होईल अशी मला आशा होती पण ते आता शक्य नाही.

2016 च्या रियो आॕलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची लढत मारीन आणि सिंधू यांच्यातच झाली होती. त्यात मारीनने पहिला गेम 19-21 असा गमावल्यावरसुध्दा 21-12, 21-15 असा सिंधूवर विजय मिळवला होता.

त्यानंतर 2019 मध्ये सिंधू विश्वविजेती बनली. त्यामुळे टोकियो आॕलिम्पिकमध्ये वर्तमान आॕलिम्पिक विजेती मारीन आणि विश्वविजेती सिंधू यांच्या संभाव्य लढतीकडे लोक डोळे लावून बसले होते पण ती लढत आता होणार नाही.

टोकियो आॕलिम्पिकला अद्याप 50 दिवस असले तरी एसीएल दुखापती भरून येण्यास फार वेळ लागतो. आता कॕरोलिना मारीन हिने झटपट सावरण्याचा चमत्कार जरी करून दाखवला तरी तिचा आॕलिम्पिक सहभाग कठीणच आहे.

2019 मध्येही मारीनच्या उजव्या गुडघ्यातील एसीएल नस फाटली होती आणि त्यावेळी तिला सावरण्यास सात महिने लागले होते.त्यातून पुनरागमन केल्यावर तिनै चीन ओपन, सैयद मोदी इंटरनॅशनल व इटालियन ओपन ह्या स्पर्धा त्यावर्षीच जिंकल्या होत्या. 2020 कोरोनामुळे वाया गेल्यावर यंदासुध्दा ती जबर फाॕर्मात होती. यंदा भाग घेतलेल्या पाचही स्पर्धांची तिने अंतिम फेरी गाठली होती. आणि त्यापैकी बीडब्ल्यूएफ टूर फायनल वगळता चार स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. त्यामुळे ती आॕलिम्पिक सुवर्णपदकासाठी पुन्हा एकदा निश्चित दावेदार होती. पण इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेदरम्यान तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या आॕल इंग्लंड चॕम्पियनशीपमध्ये ती सहभागी झाली नव्हती पण त्या विश्रांतीने फारसा फरक पडला नाही आणि तिला शस्त्रक्रियेला सामोरे जावेच लागणार आहे.

ही बाब दुर्देवी असली तरी मारीनच्या अनुपस्थितीने सिंधूच्या सुवर्ण पदकाच्या संधी वाढल्या आहेत. कारण जगातील ज्या मोजक्या खेळाडूंविरूध्द सिंधू चांगली कामगिरी करु शकलेली नाही, त्यापैकी कॕरोलीन मारीन एक आहे. मारिनविरुध्दच्या 14 पैकी 9 लढती सिंधूने गमावलेल्या आहेत.

रियोमधील सुवर्ण पदकाच्या लढतीपासून या दोघीत झालेल्या सात लढतींपैकी तीन सिंधूने तर चार मारीनने जिंकल्या आहेत. 2018 च्या मलेशीया ओपन क्वार्टर फायनलमध्ये सिंधूने मारीनवर शेवटचा विजय मिळवला आहे मात्र त्यानंतर मारीनने ओळीने तीन लढतीत सिंधूला मात दिली आहे. त्यात तिचा सर्वात अलिकडचा विजय यंदाच्या मार्चमधील स्वीस ओपन फायनलचा होता.

असे असले तरी मारीन नाही म्हणून सिंधूचा मार्ग अगदीच सोपा आहे असे नाही. टोकियोत तिच्यापुढे नंबर वन तैवानची तै झू यिंग, चीनची चेन यू फेई, जपानची नोझोमी ओकुहारा, थायलंडची रत्चानोक इंतानोन यांचे आव्हान असेलच. याची सिंधुलासुध्दा कल्पना आहे म्हणून ती म्हणते की, “अपेक्षा आसतीलच! अपेक्षा काहीही असूद्यात…मला माझी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. इतरांचा विचार करण्यापेक्षा मला माझा खेळ उंचवावा लागेल. मला चांगला खेळ करावा लागेल आणि मी चांगली कामगिरी केली तर ती देशासाठी असेल आणि त्यामुळे सर्व आनंदीत होतील.”

दरम्यान, मैदानावरची स्पर्धा कितीही कडवी असली तरी सिंधू व मारीन या चांगल्या मैत्रीणी आहेत म्हणून आता मारीनला शस्त्रक्रिया करावी लागणार हे समजताच सिंधुने तिला एका व्हिडिओ संदेशाद्वारेच लवकर बरी होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंधूने म्हटलेय की तुझ्या दुखापतीबद्दल कळल्यावर अतिशय वाईट वाटले. ती लवकरात लवकर बरी होशील आणि आणखी कणखर बनून परतशील अशी आशा करते. गेल्या आॕलिम्पिकवेळी आपण सुवर्णपदकासाठी खेळलो होतो. तो अनुभव फारच छान होता म्हणून मला तुझी गैरहजेरी जाणवेल. पण मला तुझी अनुपस्थिती जाणवेल. मी तुला मिस करेन आणि आपण लवकरच एकमेकांशी सामना खेळू अशी आशा करते म्हणून लवकर बरी हो आणि मैदानावर ये..”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button