आज इंदोरीकर महाराज कोल्हापुरात : शिवाजी विद्यापीठात तणाव

Indurikar Maharaj today in Kolhapur

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित ‘शिव महोत्सव’मध्ये आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मात्र, या कीर्तनाला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे.

अंनिसच्या सीमा पाटील यांनी इंदोरीकर यांना कोल्हापूरात पाउल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

कीर्तनकार इंदोरीकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि व्यक्त केलेली दिलगिरी यानंतर त्यांचा कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे. त्याबद्दल औत्सुक्यही आहे. विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात कीर्तनकार इंदोरीकर यांचेही कीर्तन महोत्सवाचे संकल्पक अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी आयोजित केले आहे.

अवैज्ञानिक दावे करणारे अशा कीर्तनकारला शिवाजी विद्यापीठ निमंत्रीतच कसे करते, असा सवाल सीमा पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात अंनिस आणि पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेणार आहेत.